Breaking News

लोकमंथनच्या पाठपुराव्याला यश, डेब्रीज प्रकरणात शाखा अभियंत्यांसह उपअभियंत्यांची मुंबईबाहेर तडकाफडकी बदली

मुंबई/ विशेष प्रतिनिधी

मंत्रालय इमारतीतील डेब्रीज कांडासंदर्भात आ. चरणभाऊ वाघमारे आणि दै. लोकमंथनने घेतलेल्या सडेतोड भुमिकेला पहिले यश प्राप्त झाले असून दक्षिण उपविभागाचे उपअभियंता अशोक काशीनाथ बागूल आणि शाखा अभियंता (मंत्रालय) कु. रेश्मा चव्हाण यांची मुंबई साबां प्रादेशिक विभागाच्या बाहेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान डेब्रीज प्रकरणातील संशयीतांवर कारवाई सुरू झाली असून मुख्य सुत्रधार असलेले मुंबई शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांच्यावर देखील कारवाई अपेक्षित असल्याने भ्रष्ट अभियंत्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. ---------- लीड
सन 2014-15, 2015-16, 2017-18 या आर्थिक वर्षात मुंबई शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी सहअ भियंत्यांना हाताशी धरून कोट्यावधी रूपयांचा अपहार केल्याची बाब आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या पत्रव्यवहाराने चव्हाट्यावर आली होती. आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या या पत्रव्यवहाराचा दै. लोकमंथनने वृत्तमालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने अनिच्छेने का होईना झालेल्या चौकशीत या अपहारावर शिक्कामोर्तब झाले. मंत्रालयासारख्या राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या गेलेल्या शासनाच्या मुख्यालय इमारतीत डेब्रीजच्या नावावर झालेला अपहार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या नाकाला मिरच्या झोंबणारा ठरला.
महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभारावर आ. चरणभाऊ वाघमारे यांच्यासोबत दै. लोकमंथनने डेब्रीजच्या निमित्ताने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्व बाबींचा संयुक्त परिणाम म्हणून या अपहार प्रकरणातील पहिल्या कारवाईला मुहूर्त सापडला असून त्याचा पहिला परिणाम समोर आला असून दक्षिण उपविभागाचे उपअभियंता अशोक बागूल आणि मंत्रालय शाखेच्या शाखा अभियंता रेश्मा चव्हाण यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश जारी झाले आहेत. रेश्मा चव्हाण आणि अशोक बागूल यांची थेट मुंबई साबां प्रादेशिक विभागाच्या बाहेर बदली झाल्याने शासन डेब्रीज प्रकरणी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असून यात मुख्य सुत्रधार म्हणून चर्चेत असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांच्यावरही कारवाई निश्‍चित मानली जात आहे.
उद्याच्या अंकात
मंत्रालय डेब्रीससह बिडीडी चाळ प्रकरणाच्या चौकशी प्रक्रियेतील खलनायक कोण?
कोण आहेत चौकशी प्रक्रीयेतील शुक्राचार्य?
कुणावर होणार शिस्तभंगाची कारवाई?
कुणाच्या स्वाक्षरीने निघाले कारवाईचे आदेश?
काय ठपका ठेवला या आदेशात?