Breaking News

दखल - साखर उद्योगाच्या जखमेवर पाकिस्तानी मीठ

भारतात या वर्षी साखरेचं जास्त उत्पादन होणार होतं. भलेही त्याबाबतचे अंदाज चुकले असतील. परंतु, गेल्या वर्षीची शिल्लक साखर आणि या वर्षीचं उत्पादन लक्षात घेतलं, तर देशात अतिरिक्त साखर असेल, यात तिळमात्र शंका नव्हती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातला अनुभव लक्षात घेऊन भारतानं साखरेबाबतचा निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तसं केलं नाही. वाजपेयी यांच्या काळातही देशात साखरेचं अतिरिक्त उत्पादन झालं होतं. त्यावेळी ही साखर कुठं ठेवायची, हा प्रश्‍न होता. तरीही पाकिस्तानातून साखर आयात करण्यात आली. त्यानंतर भारतीय साखर उद्योगाचं जे कंबरडं मोडलं, ते अजूनही तसंच आहे. 

वाजपेयी यांच्या काळात जी साखर आयात करण्यात आली, तिच्यातून जो नफा पाकिस्तानातील साखर उद्योगानं कमविला, त्यातून तेथील सरकारनं कारगिल घडवून आणलं. देशात देशप्रेमाचा डिंडिम बडवणारं सरकार असताना असं झालं. आताही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंधभक्त इथंही जागतिक व्यापार क रारामुळं साखर आयात झाली, असं सांगत आहेत. एकीकडं सर्जिकल स्ट्राईकच्या गप्पा मारायच्या, त्याचं श्रेय घ्यायचं आणि दुसरीकडं पाकिस्तान सरकारनं किलोमागं 11 रुपये अनुदान देऊन पाठविलेल्या साखरेला दारं खुली करायची, ही सरकारची भोंगळ नीती झाली. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच अशी साखर आयात झाली. त्या वेळी ओरड झाली. परंतु, पाकिस्तानी साखर आयात झाली नाही, असं सांगून वेळ मारून नेण्यात आली. आता जेव्हा पाकिस्तानची साखर मुंबईच्या बाजारात आली, तेव्हा त्यावरून काहुर उठलं आहे.
भारतात या वर्षी तीन कोटी 15 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सुरुवातीचा साखर उत्पादनाचा अंदाज दोन कोटी 61 लाख टनांचा होता. देशांतर्गत बाजारात फक्त दोन कोटी पन्नास लाख टन साखर लागते. अंदाजापेक्षा सुमारे 55 लाख टन जादा साखर, गेल्या वर्षीची शिल्लक साखर आणि जागतिक बाजारात साखरेचे उतरलेले भाव पाहिले, तर निर्यातीला असलेली कमी संधी या बाबी लक्षात घेतल्या, तर भारतीय साखर उद्योगापुढंच गंभीर संकट आहे. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा भाव 3500-3600 रुपये होता, तो आता 2550-2600 रुपयांपर्यंत खाली आला. साखरेचा उत्पादन खर्च सरासरी 3500रुपये प्रतिक्विंटल असताना कारखान्यांना सरासरी हजार रुपये कमी मिळत असताना त्यांचा तोटा वाढत आहे. केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामात साखरेचं जादा उत्पादन लक्षात घेऊन आयातीवर शंभर टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. तो फार उशिरा केला. साखर वीस लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पाकिस्ताननं जसे साखर निर्यातीला अनुदान दिले, तसे अनुदान देण्याचा निर्णय घेण्याचे धाडस दाखविलं नाही. या सर्व बाबींमुळं साखर कारखान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. केंद्र सरकारनं ठरवून दिलेली एफआरपीही कारखाने देऊ शकलेले नाहीत. देशात वीस हजार कोटी रुपये क ारखान्यांकडे थकले आहेत. शेतकर्‍यांना मदतीसाठी केंद्र सरकारनं 55 रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केलं आहे. वीस हजार कोटी रुपयांऐवजी 1540 कोटी रुपयांची मदत सरकार क रणार असताना उर्वरित 18500 कोटी रुपयाचं काय करायचं हा प्रश्‍न भेडसावत असताना पाकिस्तानच्या साखरेच्या आयातीनं साखर उद्योगाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे.
देशातील साखर उद्योग संकटात आहे. भाव मिळत नसल्यानं शेतकरी आणि साखर कारखानदार हतबल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सकाळी राष्ट्रवादी का ँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातील दहीसर मोरी येथील एका गोदामात धडक दिली. साखरेनं भरलेल्या गोण्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर टीका केली. देशात दंगल घडवायची असते, द्वेष निर्माण करायचा असतो, त्या वेळी भाजपला जीना आणि पा किस्तान दिसतो. आता त्याच पाकिस्तानची साखर नागरिकांना खायला घातली जाते. एकीकडं देशाचा साखर उद्योजक, शेतकरी व साखर कारखानदार मरत असून त्याला मारण्यासाठी परत तुम्ही साखरेची आयात करत आहात, असं त्यांनी मोदी सरकारला सुनावलं. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना मोदी सरकार पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. साखरेच्या गोण्यांमधून आरडीएक्सच्या गोण्याही भारतात येऊ शकतील, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली. सौरभ मल्होत्रा नामक व्यावसायिकानं ही साखर मागवली असून सुकमा एक्स्पोर्ट्स मार्फत ही साखर राज्यात पोहोचली. राष्ट्रवादीसह मनसेनंही पाकिस्तानी साखरेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचं गोड खाणार त्यांना फटके देणार, असा इशारा मनसेनं दिला आहे. राज्यात सध्या पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. पाकिस्तानमधून आलेली साखर कमी दरानं मिळत असल्यानं त्याचा फटका राज्यातील साखर कारखान्यांना बसण्याची चिन्हं आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पाकिस्तानमधून आलेली साखर खरेदी करू नये, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनीदेखील पाकिस्तानच्या साखरेवरून सरकारवर टीका केली होती. सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडं पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. साखरेचे दर घसलेले असताना पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला होता.