Breaking News

औरंगाबाद हिंसाचार : एसीपी गोवर्धन कोळेकरांची प्रकृती गंभीर

औरंगाबाद/प्रतिनिधी : शहरात उसळलेल्या दंगलीमध्ये गंभीर जखमी झालेले एसीपी गोवर्धन कोळेकर यांना मुंबईमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 11 मे रोजी झालेल्या या दंगलीप्रकरणी आतापर्यंत क्रांतीचौक, सिटीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात सुमारे 3 हजार दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलखोरांवर पोलिसांनी वेगवेगळे 6 गुन्हे नोंदवले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 70 ते 80 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी 23 जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य सूत्रधार मात्र अजुनही मोकाटच आहे. दंगलीनंतर तब्बल 48 तासानंतर शहर पूर्ववत झाले आहे. 11 मे’ला मध्यरात्रीपासून सुरू झालेली दंगल 12 मे’ला दुपारपर्यंत सुरूच होती. या घटनेत 2 नागरिकांचा मृत्यू झाला असून यात पोलिसांसह नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. गांधीनगर, नवाबपुरा, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, रोशनगेट आणि चंपाचौक येथे दोन समुदायातील शेकडो लोकांनी दगडफेक, जाळपोळ करत हल्ले केले. एवढेच नव्हे तर जमावाने तेथील दुकाने, वाहनांची तोडफोड करत लुटालूट केली होती. यामुळे संपूर्ण शहरासह जिल्ह्याचे व्यवहार विस्कळीत झाले होते.