Breaking News

कर्नाटकात सत्तेच्या चाव्या कुणाकडे ; आज फैसला


बंगळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल आज मंगळवारी हाती येणार असून, कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेवर येते, याचा फैसला होण्यास काही तासांचा अवधी उरला आहे. भाजपा व काँगे्रस दोन्ही पक्ष आपणच सत्तेवर येण्याचा दावा करत असले, तरी मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज त्रिशंकु कडे नेणारे आहे. त्यातच जेडीएस या निवडणूकांत किंगमेकरची भूमिका बजावू शकतो, अशी शक्यता देखील पुढे येत आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे अवलंबून आहेत. मोदींची दुसरी टर्म आणि राहुल गांधींचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे. कर्नाटक निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. दक्षिणेत शिरकाव करण्यासाठी भाजपच्या दृष्टीने निवडणूक महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदींच्या झंझावती प्रचारसभांमुळे कानडी मुलूख ढवळून निघाला. कर्नाटकात भाजपने विजयाचा झेंडा रोवल्यास मोदींच्या नेत ृत्वावर एकप्रकारचे शिक्कामोर्तब असेल. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी मोदींचा मार्ग सुकर ठरेल. गुजरातमध्ये भाजपला विजयासाठी झुंजावे लागले होते. तसेच गोरखपूर आणि फूलपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवामुळे मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे कर्नाटकात विजयश्री खेचून आणणे पंतप्रधान मोदींसाठी महत्वाचे आहे. एकंदरीतच 30 वर्षांची परंपरा मोडून सिद्धरामय्या दुसर्‍यांदा सत्ता खेचून आणतात का? आणि कर्नाटकात विजय मिळवून भाजप दक्षिण दिग्विजयाचं व्दार उघडणार का हे मंगळवारच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये मंगळवारी मतमोजणी आहे आणि त्यासाठी सर्व 38 मतमोजणी केंद्रांना छावणीचे स्वरूप आले आहे. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. मतदार केंद्रांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपी किंवा डीसीपी स्तराच्या अधिकार्‍यांवर असणार आहे. वैध ओळखपत्र असलेल्या क र्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांनाच मतदान केंद्राच्या परिघात प्रवेश असणार आहे. पोलीस, निम लष्करी दल, कर्नाटक राखीव पोलीस दल आणि साध्या वेशातले पोलीस, या सर्वांवर संयुक्तिकपणे सुरक्षेची जबाबदारी आहे.