Breaking News

कृषि तंत्रज्ञान अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय मागे घ्‍या : विखे

शिर्डी प्रतिनिधी 

कृषि तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अर्ध इंग्रजी माध्‍यमातील अभ्‍यासक्रम कुलगुरुंनी शासनाला अंधारात ठेऊन बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय कृषि महाविद्यालयांच्‍या गुणवत्‍तेवर विपरित करणारा आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याचे गांभिर्य लक्षात घेवून कुलगुरुंनी घेतलेल्‍या या निर्णयात तातडीने हस्‍तक्षेप करावा, कुलगुरुंवर तात्‍काळ कारवाई करावी आणि हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.

यासंदर्भात विखे यांनी राज्‍याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना सविस्‍तर पत्र पाठविले आहे. यात त्यांनी हा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याच्‍या निर्णयाने होणा-या परिणामांची वस्‍तुस्थिती विषद केली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून कृषि तंत्रज्ञान पदविका हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याबाबत शासनस्‍तरावर कोणताही निर्णय झाला नाही. शासनाचे सर्व नियम, कायदे आणि मार्गदर्शक सुचनांना डावलुन विद्यापीठाने हा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्‍य आहे का, असा प्रश्‍नही विरोधी पक्षनेत्‍यांनी कृषिमंत्र्यांसह कृषि विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्‍या अध्‍यक्षांना केला आहे.

चौकट

कृषि विद्यापीठाचा निर्णय धोक्‍याचाच 

केंद्र आणि राज्‍य सरकारने कृषि विस्‍ताराच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी अर्थसंकल्‍पात भरीव निधीची तरतूद केलेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्‍यांना बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषि शिक्षण उपलब्‍ध करुन देणे, ही शासन व्‍यवस्‍थेची जबाबदारी आहे. या अनुषंगाने मागील आघाडी सरकारमध्‍ये कृषिमंत्री असताना या अभ्‍यासक्रमाची सुरुवात प्राधान्‍याने आम्ही केली होती. मात्र कृषि तंत्रज्ञानाचा पाया भक्‍कम करण्‍याऐवजी त्‍या पध्‍दतीचे शिक्षण बंदच करण्‍याचा कृषि विद्यापीठांचा निर्णय हा कृषि व्‍यवस्‍थेसाठी धोक्‍याचाच ठरणार आहे.