Breaking News

दखल - कलाकारांची रास्त नाराजी

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याची प्रथा आहे. राष्ट्रपती तीन-चार तास उभं राहून पुरस्कार वितरण करीत असतात. चित्रपट कलावंतांना राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो. त्याचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं. राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो. पुरस्कारांची निवड जरी सरकार करीत असलं, तरी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण ही अभिमानाची आणि प्रतिष्ठेची बाब असते. 


डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या व्यक्तींनी राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा वाढविली. उर्वरीत व्यक्ती पदांमुळं मोठ्या झाल्या. राष्ट्रपती हे पदच इतकं महत्त्वाचं असतं, की त्याच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं हा त्या पुरस्कारांचाही सन्मान असतो. राष्ट्रपतींच्या नावाची सन्मानचिन्हं, पुरस्कार राष्ट्रपतींनीच द्यायचे असतात. पूर्वी एकदा अचानक राष्ट्रपतींना रुग्णालयात भरती व्हावं लागलं, तेव्हा उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. तेव्हा त्यांनी महनीय व्यक्तींनी कोणताही वाद न घालता ते स्वीकारले. दरवर्षी तीन मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा होत असतो. त्यामुळं तो एकाएकी ठरला असं म्हणता येत नाही. राष्ट्रपतींचा कार्यक्रम एकाएकी जसा ठरत नाही, तसा तो एकाएकी रद्द होत नाही. समजा आकस्मिक काही कारण घडलं, तर उपराष्ट्रपतींना पाठवून पुरस्काराचं वितरण केलं, तर संबंधितही ते समजून घेतात. मोदी यांचं सरकार आणि वाद नाही, असं कधी घडत नाही. सरकार कोणत्याही बाबीकडं फारशा गांभीर्यानं पाहत नाही. छोट्या छोट्या चुकातून वेगळे संदेश जात असतात. त्याकडं दुर्लक्ष करीत गेलं, तर सरकारविषयीची नाराजी वाढत जाते. मोदी सरकारच्या ते लक्षात येत नसावं किंवा सरकार बेमुवर्तखोर आणि बेफिकीर झालं असावं.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला काही तास शिल्लक असताना वितरण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांनी पुरस्कारावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका पुरस्कार विजेत्यांनी घेतली आहे. मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कलाकारांनी राष्ट्रपती कार्यालय, डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिव्हल आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 65वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा होणार होता. आजपर्यंतच्या परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व पुरस्कारांचं वितरण होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं हा विजेत्यांचा सन्मान समजला जातो. यंदा मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मोजक्या 10-11 पुरस्कारांचं वितरण करणार असल्याची माहिती आहे. उर्वरीत पुरस्कारांचं वितरण माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असताना अचानक स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण हा कलाकारांना आपला अवमान वाटणं स्वाभावीक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवे असले, तरी त्यांना सरकारमधून कोणीतरी कार्यक्रमाची रुपरेषा अगोदर सांगायला हवी होती. सुमारे तीन तास कार्यक्रम चालणार आहे. सर्व पुरस्कारांचं वितरण करावं लागणार आहे, याची त्यांना अगोदर पूर्वकल्पना द्यायला हवी. एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांऐवजी अन्य कोणाच्या हस्ते जेव्हा पुरस्कार दिला जातो, तेव्हा चिमुरडीही आपली नाराजी लपवू शकत नाही. इथं तर जीवनातील सर्वोच्च अशा सन्मानाचा स्वीकार राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याची स्वप्नं घेऊन दिल्लीत गेलेल्यांना डिग्निटी नसलेल्या आणि वादग्रस्त व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचं कळल्यानंतर त्यांचा स्वाभिमान दुःखावणारच.
स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास विजेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा विजेत्यांनी घेतला. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 60 कलाकारांनी नाराजी व्यक्त करीत बहिष्काराचं अस्त्र उगारलं. पुरस्कार विजेत्या कलाकारांनी दिल्लीत सकाळी 11 वाजता पत्रकार प रिषद घेतली. ते म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रपतींकडूनच दिले जातात. त्यामुळं ते त्यांच्या हस्तेच मिळाले पाहिजेत. हा कलाकारांचा आणि पुरस्काराचा सन्मान असतो. स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास आमचा विरोध नाही; मात्र आजपर्यंतची परंपरा का खंडीत केली जात आहे, असा सवाल कलाकारांनी विचारला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते म्होरक्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी सवाल केला आहे, की 64 वर्षांची परंपरा का खंडित केली जात आहे. देवकर म्हणाले, ङ्गबुधवारी पुरस्कार वितरणाची रंगीत तालीम झाली. या वेळी आम्हाला समजले, की राष्ट्रपती फक्त 10-11 जणांनाच पुरस्कार देणार आहेत. उर्वरित पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जाणार आहेत. 64 वर्षांत कधीही असं झालेलं नाही. मग यंदाच ही परंपरा का खंडित केली जात आहे.’ मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी पुरस्कारावर बहिष्कार टाकलाच पाहिजे असा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपतींनी पुरस्काराचं वितरण केलं नाही, तर या पुरस्कारांचे महत्त्व कमी होईल. अचानक आम्हाला सांगण्यात आलं, की राष्ट्रपती पुरस्कार देणार नाही. त्यासाठीचं कारणही आम्हाला सांगण्यात आलं नाही. राष्ट्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख ठरलेली असते. असं असताना अचानक स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार देणार हे सांगण्यात आलं. किमान 7-8 दिवस आधी याची कल्पना दिली असती तर आम्ही आमच्या मनाची तयारी तरी केली असती, असं मत त्यांनी मांडलं. पुरस्कार प्राप्त चित्रपट मकच्चा लिंबू’चे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी यापुढं हे कोणालाही पुरस्कार वितरणासाठी निमं त्रित करतील असा धोका व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ङ्गआज माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापुढं दुसर्‍या कोणालाही बोलावतील. यामुळं पुरस्काराचे महत्त्व कमी-कमी करून कदाचित हा सोहळाच बंद केला जाईल. राष्ट्रपतींशिवाय इतर कोणाच्याही हातून कलाकारांनी पुरस्कार स्वीकारू नये, अशी भूमिका प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी मांडली. कुंडलकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे पुरस्कारांचा सन्मान राखण्याचं आणि पुरस्कार कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधू नये असं आवाहन केलं आहे. या भूमिका पाहता एक एक घटक सरकारवर नाराज व्हायला लागला, तर त्याचे परिणाम सरकारला कधीतरी भोगावे लागतील, एवढं नक्की.