Breaking News

जगाच्या प्रगतीमध्ये कामगारांचे मोठे योगदान : गर्जे

पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - जगाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कामगारांचे सर्वाधिक मोठे योगदान आहे. त्यामुळे कामगारांना नेहमी आपलेपणाची वागणूक व मानसन्मान द्यायला हवा. जेणेकरुन आपण समाजातील उपेक्षित घटक नसून सन्माननीय घटक असल्याची जाणीव त्यांच्या ठायी निर्माण होऊन त्यांचा आत्मसन्मान वाढीस लागेल. असा विश्‍वास भाजपाचे जेष्ठ नेते अशोक गर्जे यांनी व्यक्त केला.


भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे व शहराध्यक्ष अजय भंडारी यांच्या संयुक्त पुढाकारातून, एक मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनानिमीत्ताने गर्जे कॉम्प्लेक्स येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नगरसेवक रमेश गोरे, प्रविण राजगुरू, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मुकुंद गर्जे, विधी सेवा समितीचे सदस्य नितीन गटाणी, सुनिल बेळगे, सागर गायकवाड यांच्या हस्ते महिला कामगार वैशाली पवार, शैला भावसार, सविता मासाळकर, फातिमा बेग, मंगल आडते व हिराबाई काकडे यांचा साडीचोळी देऊन वे फेटे बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना गर्जे म्हणाले, विपरीत परिस्थितीमुळे कामगार जमेल ते काम करून आपला चरितार्थ चालवतात. संघर्ष व कष्टाची जिद्दच त्यांच्या ठायी जगण्याचे बळ निर्माण करते. स्वकष्टावर त्यांचा प्रामाणिक विश्‍वास असल्याने प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची उर्जा त्यांच्या ठायी निर्माण होते. हे करत असताना आपण समाजातील उपेक्षित घटक आहोत ही न्यूनगंडाची भावना त्यांच्या ठायी निर्माण होऊ नये म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे उत्तरदायित्व प्रत्येक समाजधुरिणांनी निभवायला हवे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय भंडारी यांनी केले तर मुकुंद गर्जे यांनी सर्वांचे स्वागत केले.