Breaking News

स्मार्ट सिटीअंतर्गंत बायसिकल शेअरिंग प्रकल्प लवकरच


पुणे, दि. 2, मे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असून त्यासाठी 350 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बरोबर पॅनसिटीतील सिटी नेटवर्क, वायफाय, स्मार्ट वाहतूक, पार्किंग अशा एकूण 13 प्रकल्पांचे डीपीआर संचालक मंडळाने मंजूर केले आहेत.

एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव भागाचा समावेश झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर बायसिकल शेअरिंगचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला 350 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी कंपनीला 4 कंपन्या मदत करणार असून त्यांच्यासोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. तसेच, रूफटॉप सोलर पॉवर प्रकल्प तीन ठिकाणी 30 जून अखेर कार्यन्वित केले जाणार आहेत. त्यामधून रेस्को पध्दतीनुसार 1.1 मेगावॅट सौरउर्जेची निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे महापा लिकेच्या तीन शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प देखील स्मार्ट सिटीअंतर्गंत राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण शहरासाठी पॅन सिटीअंतर्गंत दळण-वळण व सुविधांच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी स्मार्ट नेटवर्कसाठी फायबर ऑप्टीक केबलचे जाळे, 300 वाय-वाय स्पॉट, स्मार्ट किऑक्स, स्मार्ट सिसीटीव्ही, इंटरनेटव्दारे स्मार्ट वाहतूक नियोजन, स्मार्ट पार्कीगची सोय, स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट जलनि:सारण सुविधा, स्मार्ट विद्युत यंत्रणा, स्मार्ट पर्यावरण, सोशल मिडिया अनालिस्ट, स्मार्ट मोबाईल अ‍ॅप, कमांट कंट्रोल व सिटी ऑपरेशन सेंटर आदी कामांचे प्रकल्प अहवाल तयार करून संचालक मंडळासमोर ठेवण्यात आले होते. या सर्व प्रकल्प अहवालांना मंडळाने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटीतील महत्वाकांक्षी प्रकल्पांना संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गंत सर्व प्रकल्पांच्या कामांना यापुढे गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कामे प्रत्यक्षात झाल्यानंतरच ख-या अर्थाने बेस्ट सिटीतून स्मार्ट सिटीत झालेला बदल दिसणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला स्मार्ट सिटीतील प्रकल्पांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.