Breaking News

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली,शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शाळा दि.15 जून पासून सुरू होत असून, मुंबईतील व अनेक जिल्ह्यातील शिक्षक आपल्या मूळ गावी आले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक दि.8 जून रोजी घोषित केली होती. त्यामुळे ही निवडणूक शाळा सुरू झाल्यावर घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. ही मागणी मान्य झाली असून, दि.8 जून रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


महाराष्ट्रातील मुंबई व नाशिक शिक्षक मतदार संघ तसेच कोकण व मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि.12 मे रोजी भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला होता. त्याच दिवशी अनिल बोरनारे यांनी जाहिर झालेल्या निवडणुकीच्या तारखेला विरोध दर्शवित हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली.
मुंबईसह राज्यात दि.2 मे पासून शाळांना सुट्टी असून 15 जून रोजी शाळा सुरू होणार आहे. मुंबईतील अनेक मतदार शिक्षक आपल्या मूळ गावी सुट्टी निमित्त गेले असून, शाळा सुरू होण्याच्या एक-दोन दिवस आधी मुंबईत परतणार आहे. त्यामुळे मतदानापासून ते वंचित राहणार होते. मुळातच मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये कमी नोंदणी झाली आहे. त्यातच सुट्टीमध्ये निवडणुका घेतल्या तर खूप कमी मतदान होईल या सगळ्या बाबींचा विचार करून निवडणूक आयोगाने निवडणूक शाळा सुरू झाल्यावर घ्यावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या मागणीला यश आल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.