Breaking News

मान्सूनच्या आगमनाची बळीराजाला प्रतिक्षा


कुळधरण ः कडक उन्हाळ्यामुळे सध्या अंगाची लाही-लाही होत असुन मानव जातीसह सर्व पशु-पक्षी त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असल्याने उन्हाळा कधी संपतो असे झाले आहे. आता सर्वांनाच मान्सुनच्या पावसाचे वेध लागले आहेत. शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असुन वरुणराजाची प्रतीक्षा आहे.

उन्हाच्या दाहकतेने पशु पक्षांचीही होरपळ सुरु असल्याने सर्व चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. रात्रीच्या उकाड्यामुळे सर्वांची घामाघुम होत आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला आलेला मान्सून यावर्षी मे च्या अखेरच्या आठवडयात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकर्‍यांची शेती मशागतीची कामे सध्या पूर्ण होत आली आहेत. पावसाच्या आगमनानंतरच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. पावसाची प्रतिक्षा करणार्‍या बळीराजाने अखेर रोहिणी नक्षत्राच्या आगमनासाठी वरुणराजाला साकडे घातले असून, लवकरच निसर्गकृपेने चारा पिके व पशुधनाला जीवदान मिळेल. पावसाच्या आशेने मृगाच्या पूजेची तयारीही सुरू केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस समाधानकारक सांगितला जात असला तरी, जोपर्यंत प्रत्यक्ष पाऊस येत नाही, तोपर्यंत काही खरे नाही असेच म्हणावे लागेल. कारण प्रतिवर्षी पर्जन्यात घट होत आहे. 

बेसुमार वृक्षतोड झाल्याने अनेक वेळा पावसाने हवामानाचे अंदाज फोल ठरवून हुलकावणी दिलेली आहे. शासन मोठया प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करते, परंतु लागवडीबरोबरच वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले ज़ात नाही. वृक्षांची संख्या वाढली तर पाऊस येण्यास मदत होते. रणरणत्या उन्हामुळे व वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खालावत चालल्याने शेतकर्‍यांसह प्रशासनाचेही डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.रोहिणी व मृग नक्षत्रात हमखास पाऊस होईल अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. खरीप हंगामाची पेरणी पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकरी आता मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, दिवसभर वाहणारे वारे, आकाशात दाटलेले मोकळे ढग, अधून-मधून पडणारा अवकाळी पाऊस, हवेतील प्रचंड उकाडा, यामुळे पावसाविषयी साशंकता व्यक्त होत आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरीप पिकांसाठीचे बी-बियाणे कृषी केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. कृषी विभागातही त्या दृष्टीने तयारी केली जात आहे. बियाणे व रासायनिक खते शेतकर्‍यांना वेळेवर मिळावित यासाठीचे नियोजनही करण्यात येत आहे.