Breaking News

जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक पोलीस अधीक्षक रजंनकुमार शर्मा यांची माहिती

नगर (प्रतिनिधी)03 ः जामखेड येथील दुहेरी हत्याकांडा संदर्भात मुख्य आरोपी गोविंद गायकवाड यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे जेरबंद केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, पुर्ववैमनस्यातुन ही घटना घडली असल्याचे आता तपासात पुढे येत आहे.
जामखेड तालुक्यात चार दिवसापूर्वी राकेश राळेभात व योगेश राळेभात यांची भर बाजारपेठेत गोळ्या घालुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पंधरा पथकाची तसेच एक एसआयटी पथकाची स्थापना केली होती. या प्रकरणी सात जणांना अटकही करण्यात आली होते. बुधवारी मध्यरात्री पथकाने गायकवाड व आणखी एक अल्पवयीन आरोपी या दोघांना मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे ) येथून ताब्यात घेतले. तिसरा आरोपी विजय आसाराम सावंत (रा. वाकी, ता. जामखेड) फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जामखेडचा माजी सरपंच कैलास माने याच्यासह प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन गोरख जाधव, बापू रामचंद्र काळे अशा पाचजणांना अटक केली असून, हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड (वय 22, रा. तेलंगसी, ता. जामखेड, हल्ली शिवशंकर तालीम, जामखेड) फरार होता.
दुहेरी हत्याकांडामध्ये गोविंद गायकवाड (वय 22, राहणार तेलंगशी, ता.जामखेड हल्ली शिवशंकर तालीम, तपनेश्‍वर रोड, जामखेड) विजय सावंत (रा. वाकी) व एका अल्पवयीन मुलास बरोबर घेवून त्यांनी गावठी कट्ट्यातुन गोळ्या झाडुन दोघांना ठार मारले असल्याचे सांगितले आहे. स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने या आरोपींचा छडा लावुन मांडवगण फाटा येथे आरोपी येणार असल्याचे समजल्यानंतर काल या ठिकाणी सापळा लावला. तसेच या आरोपीस अटक केले. या प्रकरणात योगेश व इतरांचे दीड वर्षापुर्वी भांडणे झाले होते. याबाबत क ोणती तक्रार दाखल झाली नव्हती. किरकोळ वाद सुरु होता. तर काही महिन्यापुर्वी दोघांमध्ये शिवीगाळीची घटना घडली होती. गोविंद याने मध्यप्रदेशवरुन दोन कट्टे आणले होते. ते या गुन्हयामध्ये वापरले असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. गोविंद गायकवाड व राळेभात बंधू यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून वितुष्ट होते. डिसेंबर 2016 साली राळेभात कुटुंबियांच्या प रिचयातील एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना गोविंद गायकवाडकडून त्या वृद्धाच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. त्यामुळे वृद्धाने याचा जाब गोविंदला विचारला होता. त्याचा राग आल्याने गोविंदने त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली होती. 


याबाबत संबंधित वृद्धाने योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर राळेभात बंधूंनी गोविंदला गाठून मारहाण केली असल्याची सांगण्यात येत आहे. तेथूनच या वादाला सुरूवात झाली यानंतर पुढे हा वाद विकोपाला गेला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर या वादावर पडता पडला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद कोणीही केली नाही. त्यानंतर या दोन गटांत कायमच खुन्नस राहिली. रस्त्याने येता-जाता रागाने पाहणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरूच होते. राळेभात गटाचे हे वर्चस्व सहन न झाल्याने गोविंद गायकवाडने राळेभात बंधूंचा काटा काढण्याचा निश्‍चय केला. योगेश व राकेश एकाच वेळी एकांतात कुठे भेटतील, अशा संधीच्या शोधात तो गेल्या दोन अडिच महिन्यांपासून होता. हत्येच्या घटनेपूर्वीही त्याने एक-दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यावेळी तो यशस्वी झाला नाही. यानंतर गोविंदने दि. 28 रोजी सायंकाळी योगेश व राकेश यांना एकांतात गाठलेच. त्यानंतर गोविंदने योगेशवर, तर दुसर्‍या अल्पवयीन साथीदाराने राकेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या या गोळीबारात दोघेही जखमी झाल्याचे पाहून त्यांनी तेथून पळ काढला. तर यातील तिसरा आरोपी विजय सावंत याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. परंतु तो अद्याप फरार आहे, अशी कबुली खुद्द गोविंद व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस अधीक्षक रोहिदास पवार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार, सहायक पोलिस निरीक्षक शरद गोरडे, कैलास देशमाने, पोलिस सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही कारवाई केली आहे.