Breaking News

मंत्रालयीन स्तरावरील पथकाने साधला ग्रामस्थांशी संवाद

प्रतिनिधी | संगमनेर - मंत्रालयीन स्तरावरील पथकाने गुरुवारी संगमनेला भेट देऊन तेथील पाणीटंचाईची माहिती घेतली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले हे पथक तालुक्याच्या पाहणीनंतर लगेचच नाशिकला रवाना झाले. पथकाने दौऱ्यात थेट ग्रामस्थांशी संवाद साधत माहिती घेतली. गटविकास अधिकाऱी सुरेश शिंदे यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याचे सांगत त्यांनी येथील कामाचे कौतूक केले. 

पिण्याच्या पाणी टंचाई निवारणार्थ स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पथकाची स्थापना करण्यात आली. उपसचिव प्र. गि. कानडे, कक्ष अधिकारी सुनिल तुकराम आणि सहाय्यक कक्ष अधिकारी श्रीप्रसाद रेंगे यांचा या पथकात समावेश आहे. हे पथक नाशिक आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत आहे. निवडक गावांना भेटी देतांना पथकाने गुरुवारी संगमनेर खुर्द येथील टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केलेल्या विहीरीची पाहणी केली. 

यावेळी पथकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचीदेखील समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याने पथकाने येथील कामांसंदर्भात समाधान व्यक्त केले. दरम्यान, ग्रामपंचायत विहीर अधिग्रहणाची रक्कम नागरी क्षेत्राच्या दराप्रमाणे मिळायला हवी, अशी मागणी रायतेवाडीचे ग्रामसेवक राजेश गुंजाळ यांनी उपसचिव कानडे यांच्याकडे केली. कानडे यांनी यासंदर्भातील नेमकी अडचण लक्षात घेत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.