Breaking News

मुख्यमंत्र्यांवर धमकीचा गुन्हा दाखल करा’

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघर लोकसभा निवडणुकीत जी क्लिप समोर आली त्यात ते स्वतः विरोधकांना धमक्या देत आहेत. ते हल्ला करण्यासारख्या चिथावणीचे वक्तव्य करत आहेत. मी सर्वात मोठा गुंडा असल्याचे ते सांगत असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याने याची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

भाजपकडून साम-दाम-दंड आणि भेद याचा वापर करत पालघर आणि भंडारा-गोंदिया या निवडणुका जिंकण्यासाठी आचारसंहितेचे घोर उल्लंघन करण्यात येत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिपमधील वक्तव्य हे अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर धमक्या दिल्या म्हणून कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. पालघरमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. त्यामधील मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा. मी सर्वाधिक मोठा गुंड आहे, असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची भाषा ही चितावणीखोरपणाची आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाने ऐकून त्याची खात्री करुन किंवा वेळ पडल्यास फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवावी आणि पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुका पराभूत होत असल्याचे लक्षात येताच भाजप साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बळाचा वापर आणि पैशाचा वापर भाजपकडून केला जात आहे. शुक्रवारीच पालघरमध्ये पैसे वाटणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍याला ताब्यात घेण्यात आले आहे.
शिवसेनेने ही ऑडिओ क्लिप बाहेर काढली आहे. ती सभेत जनतेसमोर पुंगी म्हणून न वाजवता, हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. त्यावर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो, असेही नवाब मलिक म्हणाले.