Breaking News

स्त्रियांनी सामाजिक स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करावे

स्त्री-पुरूष विषमता आणि जात धर्मग्रंथांनी प्रस्थापित केली आहे. कुटूंब संस्थेतून ही हस्तांतरीत करण्यात येते. या धर्मसंस्थेत, जात व्यवस्थेत स्त्रियांचा समावेश नाही. स्त्रियांनी धर्मग्रंथांची हमाली सोडून सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व करावे असे प्रतिपादन औरंगाबाद येथील विद्रोही कवयित्री, विचारवंत प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. 

सीएसआरडी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणा पर्व 2018 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये समाजकार्यकर्त्यांसमोरील आव्हाने याविषयावर डॉ. अहिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, भारतात साडेसहा हजार जाती त्यांच्या पोटजातीत समाज विखुरलेला आहे. हा समाज एकमय नसल्याने अद्याप राष्ट्रात रूपांतरीत झालेला नाही. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर तिची जात आणि धर्म पाहून अत्याचारावर प्रतिक्रीयांची तीव्रता व्यक्त होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी अडीच वर्ष गुलामीत ठेवलेल्या व ज्ञानबंदी केलेल्या शुद्रातीशुद्र बहुजनांना शिक्षण दिले. त्यांनी शिक्षण हे गुलामी नष्ट करण्याचे क्रांतीचे शस्त्र मानले मात्र आज भांडवलशाही प्रबळ करण्यात आली आहे. शिक्षणाचे व्यावसायीकरण करण्यात येत आहे. धर्मांधता, जातीयता वाढवून स्त्रियांचे वस्तूकरण करण्यात येत आहे. प्रश्‍न उपस्थित करू नये अशी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ही सर्व आव्हाने सामाजिक कार्यकर्त्यांसमोर आहेत. ही आव्हाने केवळ सामाजिक कार्यकर्त्यांसमोरच नसून ती देशासमोरील आहेत. आव्हाने परतविण्यासाठी प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी भाग्यश्री राठोड, अमोल राठोड, रविंद्र माघाडे, शैलेंद्र मानतकर, विकास जगताप यांनी खुल्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी प्रा. सुरेश मुगूटमल, प्रा. अविनाश गोरे, प्रा. योगेश कुदळे, सॅम्युअल वाघमारे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी सुरगणे यांनी तर आभार रमवई डायमरी यांनी मानले.