Breaking News

कचरा प्रकल्पात रिंग केलेल्यांना काळया यादीत टाकण्याची मागणी

पुणे, दि. 06, मे - पुणे पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासंबंधातील निविदांमध्ये रिंग केल्याची सहा कंपन्यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना काळया यादीत टाकण्याची कारवाई करा. पालिके च्या कोणत्याही निविदामध्ये त्यांना भाग घेवु देऊ नये, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विविध स्वंयसेवी संस्थांनी केली आहे. 


पालिकेच्या 24 तासात खत निर्मिती करणारी यंत्रणा बसवण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणा-या कंपन्या आणि त्यांच्या अधिका-यांवर संगनमताचा ठपका ठेउन त्यांना दंड केला आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकमेकांच्या संगणकावरून निविदा भरणे , एकाच खात्यातून इतर निविदादारांच्या अनामत रकमेचा ड्राफ्ट काढणे , प्रतिस्पर्धी निविदादारांचा पत्ता एकच असणे, किमान तीन निविदा आल्या असे भासवण्यासाठी बोगस निविदादार उभा करणे , त्यासाठी त्याला कागदपत्रे पुरवणे इत्यादी अनेक गैरव्यवहार घडले आहेत. आयोगाने या कंपन्यांना तीन कोटी सत्तावन्न लाख सव्वीस हजार नउशे एक्याऐशी रुपये इतका दंड केला आहे. त्यामुळे या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची कारवाई करा. पालिकेच्या कोणत्याही निविदामध्ये त्यांना भाग घेवु देउ नये, अशी मागणी विरोधीपक्षनेते चेतन तुपे आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आयुक्ताकडे केली आहे.