Breaking News

येवला, निफाडसह मनमाडच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची छगन भुजबळ यांची मागणी


नाशिक, दि. 16, मे - येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहर, येवल्यातील 38 गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तसेच मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे येवला शहारासोबतच 38 गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेली गावे तसेच मनमाड शहरात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जवळपास आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठ या जलाशयांमध्ये शिल्लक आहे. पालखेड धरण समुहामध्ये येवला, मनमाड व निफाड येथील बिगर सिंचन योजनांसाठी पाणी राखीव असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

येवला व मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयांसोबतच येवला व निफाड तालुक्यातील प्रासंगिक आरक्षण असलेले बंधारे भरून दिल्यास अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे येवला मनमाड शहर तसेच येवला व निफाड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लक्षात घेवून पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात केली आहे.