Breaking News

कुपोषण निर्मूलनासाठी यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे - गीते


नाशिक, दि. 16, मे - कुपोषण निर्मूलनाचे काम अतिशय समाधानाचे काम असून गेल्या 12 वर्षापासून यामध्ये मी काम करीत आहे. कुपोषण निर्मुलनासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. सुदृढ पिढी घडविण्याची महत्वाची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून कुपोषण निर्मूलनाकडे काम म्हणून न बघता आपल्या घरातीलच काम आहे असे समजून काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेचा कुपोषण हाच सर्वाधिक महत्वाचा विषय राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येवला पंचायत समितीची आढावा बैठक आज डॉ गिते यांच्या उपस्थितीत येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात घेण्यात आली. यावेळी डॉ गिते यांनी कुपोषणाबाबत सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले. कुपोषण निर्मुलन झाल्यास एक सुदृढ व बौद्धिक पिढी तयार होणार असून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास झाल्यास निश्‍चितच आपल्या सर्वानाही कामाचे समाधान मिळणार आहे. कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून जिल्हा कुपोषण मुक्त करणारच असा निर्धारही डॉ गिते यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीच्या सुरुवातीलाच ग्राम बाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहार संहिता याबाबत डॉ गिते यांनी आढावा घेतला. जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचाही त्यांनी आढावा घेतला.तसेच ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश गिते यांनी दिले. मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना सुट्या घ्यावयाच्या असतील तर त्यांना मुभा असून ज्या अंगणवाडी सेविकांना ग्राम बाल विकास केंद्राचे काम क रावयाचे असेल त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे असेही डॉ गिते म्हणाले.

महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना ग्रामसेवकांनी ग्राम विकास आराखड्यातील 10 टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देशही दिले. सुरवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुशील वाघचौरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आयुष्यमान भारत योजनेचा प्राथमिक केंद्रानुसार आढावा घेण्यात आला. पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांनी दुषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी, नादुरुस्त शौचालयांचा आढावा घेतला.