Breaking News

कोकणला गरीब ठेवण्याचे कारस्थान - प्रसाद लाड


सिंधुदुर्ग, दि. 16, मे - कोकणात रोजगारनिर्मिती झाली तर येथील बेरोजगार मुंबईला जाणार नाही. तसेच कोकणातच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर येथील भूमिपुत्र कुठल्याच राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला जाणार नाही. यात शिवसेनेसह अन्य पक्षांच्या व्होट बँक संपुष्टात येणार आहेत. त्यामुळेच हे पक्ष नाणार येथील ग्रीन रिफायनरीला विरोध करीत आहेत. कोकणवासियांना गरीब ठेवण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला.

हरकुळ खुर्द येथील माजी सरपंच सुभाष दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथील हॉटेल अनंत येथे आमदार लाड यांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम झाला.
लाड म्हणाले, पूर्वीच्या सरकारने केवळ भूलथापा दिल्या. त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचा नारळ फोडला. मात्र, काम तसेच ठेवले. पण भाजप सरकारने वेगाने चौपदरीकरणाचे काम सुरु केले. त्याचबरोबर सागरी महामार्गाचाही विकास करण्यात येत आहे. ग्रीन रिफायनरीमुळे हॉटेल, पर्यटन, वाहतूक आदी सर्वच क्षेत्रांत रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्ना गिरी, रायगड यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱयापर्यंत विकासाची गंगा येणार आहे.

जिल्हयातील 500 गावांमध्ये आपण सहदत्तक होत आहे.यावेळी प्रवेशकर्ते सुभाष दळवी यांनी गावचा विकास भाजपच्याच माध्यमातून होऊ शकतो. म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. दळवी यांच्यासह राजा डिचोलकर, सुरेश हुले, शशिकांत मडव, दादा पुंभार, दामोदर परब, अशोक राणे, संतोष रासम, बाळू रासम, मंगेश चव्हाण, दीपक हुले आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.