Breaking News

किसान कल्याण कार्याशाळा उत्साहात.


श्रीगोंदा येथील पंचायत समितीमधील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात महाराष्ट्र शासन कृषि विभाग व पंचायत समिती श्रीगोंदा यांचे संयुक्त विदयमाने ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे या मोहिमेंतर्गत किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना, श्रीगोंद्याचे तालुका कृषि अधिकारी व्हि.बी. दारकुंडे यांनी कृषि विभागाचे विविध योजनांचे मार्गदर्शन केले. यामध्ये म.ग्रा.रो.ह.यो. गट समुह शेती, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेततळे, अस्तरीकरण कांदा चाळ, आत्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण, अभ्यासदौरे, सेंद्रीय शेती, तसेच जमीन आरोग्य पत्रिका, जलयुक्त शिवार अभियान, शेतकरी अपघात विमा, पिक विमा योजना, यांत्रिकीकरण, हरीत गृह, शेडनेट हाऊस, कोल्ड स्टोरेज, पिक प्रात्यक्षिके या योजनांबाबत मार्गदर्शन केले. 
सदर कार्यशाळेत जमिन आरोग्य पत्रीका, जमिनीचे व्यवस्थापन, माती व पाणी परीक्षणाचे महत्व, याबाबत विजय केदारे (कृषि सहाय्यक) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. किरण मांगडे, मंडळ कृषि अधिकारी श्रीगोंदा यांनी कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मीक व्यवस्थापन तसेच कापुस पिक उत्पादन व तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
 
यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद गोपाळे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना यामध्ये जनावरांचे आधार कार्ड, आय.एन.पी.एच. अनुवंषीय सुधारणा कार्यक्रम, देशी गायी संवर्धन, कडबा कुट्टी, हायड्रोपोनिक्स, मुरघास मुक्तसंचार गोठा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जयंत साळवे कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी पंचायत समिती कृषि विभागाच्या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी छत्रपती सन्मान योजना, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. तुकाराम दरेकर यांनी उत्पादन खर्च आधारीत बाजारभाव, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ओलिताखालील क्षेत्रामध्ये गावे निवडली जावीत, तसेच पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे अपघात योजना यांच्या जाचक अटी वगळाव्यात अशी अपेक्षा व्यकत केली. तसेच सध्या कृषि विभागाच्या ऑनलाईन पद्धतीने केले जाणार्‍या यांत्रिकीकरण, शेततळे, अस्तरीकरण कांदाचाळ, नियंत्रित शेती यांच्या सोडतीनुसार लाभार्थी निवड प्रक्रीया पारदर्शक पणे केली जात असुन याबाबत समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम लगड यांनी म.ग्रा.रो.ह. यो. अंतर्गत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी शेततळ्याचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे सांगितले, तसेच कृषि विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिरायत गावांचा पाण्याचा कायापालट झाला असुन पाण्याची समस्या सुटलेली आहे. 

यावेळी आभार कृषि अधिकारी आर. एन मचे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोदगे यांनी केले. या कार्यक्रमास अलका शिरसाठ गट विकास अधिकारी, श्रीगोंदा पं. समिती सदस्य सुरेश गोरे, शहाजी हिरवे, प्रगतशील शेतकरी अतुल लोखंड, मारुती डाके, गणेश अनभुले, विजय मचे, एस.ए. शिंदे, जयंत साळवे, नंदकुमार घोडके, अनिल औटी तसेच तालुक्यातील शेतकरी, व कृषि विभाग व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.