Breaking News

लाखात घर योजनेचे राशिनला भूमीपूजन


कर्जत तालुक्यातील राशिन येथील वासुदेव फर्निचरच्या वतीने कामगारांना एक लाखात घर देण्याच्या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. वासुदेव फर्निचरचे व्यवस्थापक राजु साखरे यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला.वासुदेव फर्निचरचे मालक व उद्योजक मेघराज बजाज यांनी कामगारांसाठी योजना आणली आहे. राशिन येथे फर्निचर व्यवसाय सुरु करुन त्यांनी या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. बजाज यांनी कामगारांना एक लाखात घर देण्याची घोषणा नुकतीच केली होती. 

या योजनेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी उद्योजक मेघराज बजाज यांच्यासह नाना टकले, आबा लाहोर, अभियंता बरबडे, अशोक वाघमारे, नाना खुडे आदी यावेळी उपस्थित होते. कर्जत, करमाळा आदी तालुक्यातील कित्येक शाळांना मोफत फर्निचरचे वाटप करुन बजाज यांनी मोठे सामाजिक कार्य उभारले आहे. टेबल, खुर्च्या, डायस, चप्पलस्टँड असे लाखो रुपयांचे फर्निचर त्यांनी वितरित केलेले आहे. त्यांच्या रूपाने दातृत्व व समाजसेवेचा एक आदर्श निर्माण झाला आहे.