Breaking News

जामखेडच्या गुन्हेगारीचे मूळ खाजगी सावकारी, तालमीत : दिलीप वळसे

जामखेड  तालुक्यातील गुन्हेगारीचे मूळ हे राजरोसपणे सुरू असलेले अवैध खाजगी सावकार, बेफाम चाललेली प्लॉटींग, वाळू तस्करी, अवैध धंदे व तालमीत पोसले जाणारे गुंड यामध्ये आहे. हे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जनता सुरक्षित नाही. गुन्हेगारी रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.


28 एप्रिल रोजी जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राळेभात बंधूंची भर बाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वळसे पाटील जामखेड येथे आले होते. यावेळी त्यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. राहुल जगताप, राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, मंजुषा गुंड, शारदा लगड, शारदा भोरे, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, डॉ. भास्कर मोरे, संजय वराट, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, हनुमंत पाटील, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, संदिप वर्पे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रभारी राज आहे. तीन वर्षांत बारा पोलीस निरीक्षक येतात आणि जातात. एकही कायम नाही. सर्व काही प्रभारीराज आहे. यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तीन महिन्यांपुर्वी शहरात गोळीबार झाला होता. यातील आरोपी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी होते. तेदेखील शहरात आज राजरोसपणे फिरतात, मात्र पोलिसांना सापडत नाहीत. राळेभात बंधूंच्या हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेले काही आरोपीही सत्ताधारी भाजपाचे आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्याबरोबर त्यांचे छायाचित्रे आहेत. या हत्याकांडातील मास्टर माईंड वेगळाच आहे. तो शोधला जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
तालुक्यातील गुन्हेगारीचे मूळ हे तालमीत आहे. तालमीत मल्ल नव्हे तर गुन्हेगार तयार करतात. यांना राजाश्रय देण्याचे काम सत्ताधारी भाजपातील नेते करीत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसतात. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होत नाही. तेथे उपचार काय होत असतील असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला.