Breaking News

रस्त्यावर दूध ओतून रास्ता रोको आंदोलन


सोलापूर, दि. 17, मे - दूध दरवाढीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. पण शेतकर्‍यांच्या जीवावर राजकारण करून निवडून येणार्‍या राजकारण्यांना शेतक र्‍यांच्या प्रश्‍नाविषयी काहीही सोयरसुतक नाही. गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये दर मिळणे आवश्यक आहे. आठवड्याभरात दूध दरवाढीचा निर्णय न झाल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी दिला. 
दूध दरवाढीच्या मागणीसाठी शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ येथे रस्त्यावर दूध ओतून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार किशोर बडवे यांना देण्यात आले. ते म्हणाले, शेतकर्‍याला न्यायासाठी झगडावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकरी अनेक संकटांचा सामना करित पशुधन वाचवत आहे. चारा, पाण्याचा प्रश्‍न सातत्याने भेडसावत असताना शासन मात्र शेतकर्‍यांच्या मागणीकडे दूर्लक्ष करत आहे. शिवक्रांती संघटना दूध दरवाढीसाठी आणखी आंदोलने करणार आहे.