Breaking News

अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीची मुदतवाढ न देण्याची भूमिका


पुणे, दि. 17, मे - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग 1 च्या अधिकार्‍याच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांपासून 62 वर्षे करण्यास कनिष्ठ अधिकार्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या 143 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या आधीच वाढविलेल्या वयाची मुदत येत्या 31 मे रोजी संपत आहे. पुन्हा संबंधित अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीची मुदतवाढ देऊ नये अशी भूमिका जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने घेतली आहे. 

वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचा निर्णय 2016 पासून लागू करण्यात आलेला आहे. आरोग्य विभागात असलेली अधिकार्‍यांची कमतरता, रिक्त पदांचा प्रश्‍न आणि त्यामुळे रुग्णसेवेवर होत असलेला परिणाम यामुळे या वरिष्ठ अधिकार्‍यांचे वय वाढविण्यात येत असल्याचे कारण त्यावेळी आरोग्य विभागाक डून देण्यात आले होते. त्यावेळी सेवानिवृत्तीला आलेल्या राज्यातील सुमारे 143 वरिष्ठ अधिकार्‍यांना या निर्णयाचा फायदा झाला होता. आता येत्या 31 मे रोजी हे सर्व अधिकारी वाढीव दोन वर्षांची सेवा संपवून सेवेतून निवृत्त होणार आहेत. मात्र, या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आता पुन्हा आपल्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे कनिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत.