Breaking News

राहुरी-मांजरी रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन

शहर हद्दीतून जाणारा राहुरी-मांजरी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मालिकाच रास दिसून येत असून ओबडधोबड झालेल्या रस्त्याने जाता येता वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरातलवकर दुरुस्त करावा. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारु, असा इशारा राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को-अॉप.सोसायटीचे विद्यमान संचालक आर. आर. तनपुरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, राहुरी येथून मांजरीकडे जाणारा रस्ता नाका नंबर पाच ते पांडूरंग मंगलकार्यालय या भागात साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत दयनीय झालेला आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावर विखरून टाकण्यात आलेली खडी रस्ता वाहतुकीस अडचणीचा ठरत आहे. नाका नंबर पाच ते तनपुरे, खळवाडी या पाचशे मीटर अंतराच्या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्त्याच्या डागडूजीसाठी येथे खडी व इतर साहित्य आणून रस्ता बांधणीचा केवळ संबंधित विभाग दिखावा करते. मात्र येथील साहित्य गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. या बाबीकडे राहुरीचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. 

यासाठी निवेदन देण्यासाठी आर. आर. तनपुरे आणि कार्यकर्ते येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात गेले असता येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता हे नेहमीप्रमाणे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. तनपुरे यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता ‘बाहेर’ आहे, असे उत्तर मिळाले. शाखा अभियंतादेखील तेथे उपस्थित नव्हते. निवेदन घेण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने तनपुरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी फुलचंद जाधव यांच्या दालनातील मोकळ्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी करत कर्मचाऱ्यांना निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेवक अक्षय तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष आघाव, युवा नेते ऋषीकेश तनपुरे, जयकिसन चौरसिया, विवेक इंगळे, सचिन वराळे, बाळू पन्हाळे, आदित्य खाबिया आदी उपस्थित होते.