Breaking News

जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही पीककर्ज मिळेना, सेन्ट्रल बँकेच्या अरेरावीमुळे शेतकरी हवालदिल


संपूर्ण वर्षभर हेलपाटे मारुनही सेन्ट्रल बँकेच्या पाथर्डी शाखेने पीककर्ज नाकारल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे निरुपाय झाल्याने विमनस्क अवस्थेत येऊन शेतकरी आत्महत्याभिमुख होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही त्यांचे आदेश धाब्यावर बसवण्याचा हिय्या या शाखेच्या व्यवस्थापनाकडून केला जात आहे.
 
मोहोज देवढे येथील एका शेतकर्‍याने वर्षभरापूर्वी पीककर्ज मागणीचा प्रस्ताव सदर शाखेस सादर केला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सदर शाखेच्या प्रबंधकांनी त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन वारंवार शाखेतून हाकलून दिले आहे. किमान शंभर वेळेस पाथर्डीला ये-जा करण्यास संबधीत शेतकर्‍याला हजारो रुपये खर्च आला आहे. शिवाय एकदा दुचाकीवर जात असताना अपघातही झाला आहे. त्यामुळे जोडीदाराला गंभीर दुखापत झाल्याने सदर शेतकर्‍याने त्यासाठी लाखो रुपये खर्च केला आहे. या सार्‍या घटनांमुळे संबधीत शेतकरी मेटाकुटीस आला असून जीव नकोसा झाल्याची भाषा करीत आहे. गावातील चारचौघांनी त्याला समजावले असले तरी त्याच्यामागचे शुक्लकाष्ठ संपलेले नसल्याने तो विमनस्क अवस्थेत फिरत आहे. अशी वेळ अजुनही कित्येक शेतकर्‍यांवर आली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या आत्महत्यांत कमालिची वाढ होत असूनही बँकेच्या अशा अडेलतट्टू धोरणामुळे त्याला हातभारच लागत आहे. संवेदनाहीन अधिकार्‍यांना त्याच्याशी काही एक देणेघेणे उरले नसल्याने इतर बँकाही त्यामुळे हकनाक बदनाम होत आहेत. ’सबका साथ सबका विकास’ ही पंतप्रधानांची घोषणा किती तकलादू आहे, हे निदान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी प्रकर्षाने जाणवत आहे. शेतकर्‍यांना बँकेत अक्षरशः भिकार्‍याची वागणूक मिळत आहे. निदान सेन्ट्रल बँकेच्या पाथर्डी शाखेत तरी हेच चित्र हमखास पाहायला मिळत आहे. त्यामुळे सदर बँकेच्या वरिष्ठ प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा सदर बँकेच्या नावलौकिकास बाधा आल्याशिवाय राहणार नाही.