अग्रलेख - पोटनिवडणूकांत भाजपची नामुष्की !
देशातील 10 राज्यात झालेल्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा निवडणूकीत भाजपांची पीछेहाट होतांना स्पष्टपणे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पालघर वगळता भाजपची नाचक्की झाल्याचेच दिसून येत आहे. पोटनिवडणूका हा येणार्या लोकसभा निवडणूकांची नांदी असल्यामुळे या पोटनिवडणूकांना विशेष असे महत्व प्राप्त झाले होते. भाजपाची संपूर्ण ताकद पणाला लावून मैदानात उतरण्याची शैली मात्र पोटनिवडणूकांत कामी येतांना दिसून येत नाही. भाजपाला केंद्रात सत्तेत येऊन चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यानि मित्ताने भाजपाविषयी असलेला रोष मतपत्रिकेतून स्पष्ट दिसून येत आहे. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ ही भाजपांची पीछेहाट होण्याची प्रमुख कारणे मानता येईल. भंडारा-गों दियातील भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकत काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. पटोले यांनी प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवत, मोदी खासदारांना स्वातंत्र्य देत नाही, अशी त्यांनी टीका केली होती. याठिकाणी पोटनिवडणूकीत ही जागा राष्ट्रवादी आपल्या पदरात खेचून घेण्यात यशस्वी ठरली. मात्र या मतदारसंघात प्रचारयंत्रणेची संपूर्ण जबाबदारी ही नाना पटोले यांच्यावर होती, आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. तर दुसरीकडे पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली होती. तर बहुजन विक ास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती. मात्र ही पालघरची जागा अनेपिक्षतपणे भाजपाने कायम राखली. मात्र त्यासाठी त्यांना काँगे्रसकडून उमेदवार आयात करावा लागला. असे असले तरी राजेंद्र गावीत यांनी ती जागा खेचून आणली. भंडारा-गोंदिया व पालघर या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या मोठया नेत्यांनी सभा घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या मतदारसंघात तळ ठोकला होता. तर दुसरीकडे या मतदारसंघात काँगे्रसचे बडे नेते फिरकले सुध्दा नाही. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने घेतलेली मतांची आघाडी ही भाजपच्या पथ्यांवर पडली, अन्यथा शिवसेनेचा उमेदवार येथुन विजयी होऊ शकला असता. उत्तरप्रदेशांतील पराभव तर भाजपाची पुरती नाचक्की करणारा आहे. उत्तर प्रदेशमध्ये मार्च महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फुलपूर या लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. त्यापाठोपाठ बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची हार झाली होती. 2014च्या ऐतिहासिक विजयानंतर गेल्या चार वर्षात भाजपची कामगिरी घसरत चालली आहे. 2014 ते मार्च 2018 या कालावधीत लोकसभेच्या 23 पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी केवळ 4 जागांवर भाजपला विजय मिळवता आला. पोटनिवडणूकांतील भाजपची कामगिरी ही खालावत चालल्याचे दिसून येत आहे.