Breaking News

शहर इलाखा साबां विभागातील सोनेरी वॉल पेपर कांडाचा रहस्यभेद दादा! मला वाचवा... कार्यकारी अभियंत्यांची आर्त आळवणी

मुंबई/ विशेष प्रतिनिधी। 17 : शहर इलाखा साबां विभागातील सन 2014 ते 2017 या तीन आर्थिक वर्षातील बहुचर्चीत मंत्रालय परिसर घोटाळ्याचा रहस्य आज (गुरूवार) खोदण्यात प्रधानसचिव आशिषकुमार सिंह आणि मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी खोदून काढण्यात यश आले आहे. दरम्यान दक्षिण साबां उपविभागाचे उपअभियंता अशोक काशीनाथ बागूल यांना तात्काळ बेमुदत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. 

आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या सात तक्रारीवरून शहर इलाखा विभागातील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्याचा पहिला परिणाम आज गुरूवारी समोर आला.
मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याकडे या तक्रारींची चौकशी सोपवण्यात आल्यानंतर पहिला अपेक्षित परिणाम दिसला. सहाव्या माळ्यावरील 618 क्रमांकाच्या प्रधान सचिवांच्या दालनापासून शनीवारी या चौकशीला प्रारंभ झाला होता. हे दालन आनंद कुलकर्णी अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांच्यासाठी सजविण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी विशेष स्वारस्य दाखविले होते. या स्वारस्याचे खरे कारण आज समोर आले आहे.
सन 2014 -15 या आर्थिक वर्षात कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी या दालनावर 16 लाख 70 हजार खर्च करून आनंद कुलकर्णी यांना गुरू दक्षिणा दिली होती. त्यानंतर काही महिन्यातच सन 2015-16 या आर्थिक वर्षात या दालनावर तब्बल 46 लाख रूपये खर्च करून दालन सजविण्याचा खटाटोप झाला. विशेष म्हणजे या 46 लाखाच्या कामांची अखंड निविदा काढणे आवश्यक असताना या कामांचे बेकायदेशीर तुकडे पाडून निविदा संहीतेचा भंग केला तर दुसर्‍या बाजूला तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी या दालनात नऊ लाख रूपयांचा सोनेरी वॉल पेपर लावल्याचे दाखविले. 
या दालनात जेव्हा प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी पाऊल ठेवले तेव्हा सोनेरी वॉल पेपरवर नऊ लाख रूपये खर्च झाल्याचे ऐकून आश्‍चर्याचा धक्का बसला. आज धनंजय चामलवार हे या दालनात चौकशीसाठी प्रवेशीत झाल्यानंतर स्वतः प्रधान सचिव यांनी या सोनेरी वॉल पेपरवर खर्च झालेल्या नऊ लाखाचा शोध घेण्याच्या हेतूने नऊ इंची कटरने खोदून पाहीले. यात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी वालपेपर लावण्यापुर्वी प्लायवूड ठोकण्याची चापलूसी केली होती. हे लक्षात आल्यानंतर प्रधान सचिवांनी या सोनेरी वॉल पेपरच्या खरेदी बिलाची मागणी केली. 
बिल मिळत नसेल तर निदान ज्या दुकानातून सोनेरी वॉल पेपर खरेदी केले ते दुकान तरी दाखवा असे फर्मावले. मात्र यावर कुणाकडेच उत्तर नव्हते. 
आजच्या या प्रक्रियेतून शहर इलाखा विभागातील अनेकानेक प्रकरणांपैकी सोनेरी वॉल पेपरचे गुढ उकलले. एका बाजूला ही कार्यवाही पार पडत असताना दक्षिण साबां उपविभागाचे उपअभियंता अशोक काशीनाथ बागूल यांना या एकूणच प्रकरणाचा ठपका ठेऊन बेमुदत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यावरून या प्रकरणात अन्य दोषी कार्यकारी अभियंत्यावर निश्‍चित कारवाई होईल, असे संकेत मिळत आहेत म्हणूनच रणजीत हांडे यांनी गेल्या दोन दिवसापासून चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी तळ ठोकून दादा! मला वाचवाची आर्त हाक दिली आहे.
उद्याच्या अंकात
रणजीत हांडे यांच्या पायाखालची वाळू का सरकली
श्रीनिवास जाधव यांच्यामार्फत चौकशी अधिकारी बदलण्याची 
प्रधान सचिवांकडे रणजीत हांडे यांनी रदबदली करवून का 
घेतली?
प्रधान सचिवांनी श्रीनिवास जाधव यांना काय सुनावले?