Breaking News

कोंची डोंगराला आग ; सतर्कतेमुळे हानी टळली


संगमनेर प्रतिनिधी - सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढली असून वाढलेल्या उष्म्यामुळे अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लागून वनांचे नुकसान होत आहे. आज {दि. ३०} भरदुपारी येथील कोंची परिसरातील नेमताईच्या डोंगराला आग लागली. मात्र वृक्षप्रेमी असलेले अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली.

स्थानिक कार्यकर्त्यांनी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधत त्यांना या आगीची माहिती दिली. त्यानंतर शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोंचीमधील अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करुन आग विझविण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी त्यांना अमर वाणी, विकास मच्छिंद्र बर्डे आदींसह वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मोलाची मदत केली. या सर्वांनी पेटलेला वणवा अटोक्यात आणण्यासाठी पाण्याचे टँकरचा वापर केला. शिंदे यांच्याकडील पाण्याचा ब्लोअर आणि १ हजार फूट पाण्याची नळी यामुळे तरुणांना आग विझविण्यात मोठी मदत झाली. आग आटोक्यात आल्याने डोंगरावरील वन्यजीव, प्राणी, शेजारी असलेल्या आदिवासी बांधवांच्या वस्त्या आदींसह मोठी जिवित्त आणि वित्तहानी टळली.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत सीईओ अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून या डोंगरावर मोठी हिरवाई निर्माण झाली आहे. सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानातून उघड्या बोडक्या डोंगरावर हजारो झाडे लावण्यात आली. मात्र ती प्रत्येकाने जपली पाहिजे. वृक्षप्रेमी असलेले शिंदे यांनी स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी केलेले कार्य हे इतर ठिकाणच्या ग्रामस्थांना दिशादर्शक ठरणारे आहे.