पोलिस पाटलाविरुध्दची फिर्याद रद्द
कोपरगाव : तालुक्यातील येसगाव येथील विवाहिता कल्पना कळसकर हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विवाहितेचा पती व नणंद यांच्यासह पोलिस पाटील बाबासाहेब गायकवाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गायकवाड यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला. मात्र त्यानंतर पोलीस पाटील गायकवाड यांनी त्यांच्याविरुध्दची फिर्याद रद्द करण्यासाठी औरंगाबाद येथील हायकोर्टात अर्ज केला होता. यामध्ये अर्जामध्ये अंतिम निकाल देऊन अर्जदार माजी पोलिस पाटील यादवराव गायकवाड यांच्याविरुध्दची फिर्याद रद्द केली. गायकवाड यांच्यावतीने विधिज्ञ संकेत कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी आणि आर. एम. नागरे यांनी काम पाहिले.