Breaking News

लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा : पिचड

संगमनेर /प्रतिनिधी। संगमनेर हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणारा तालुका आहे. त्यानंतर अकोले तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेर व अकोले तालुक्यातून आणखी एक एक तालुक्याची निर्मिती करण्यात येणार आहे. संगमनेरसही अन्य तालुके नूतन जिल्हा करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा, अशी आग्रही मागणी अकोले तालुक्याचे आ. वैभव पिचड यांनी केली आहे.

संगमनेर येथे जिल्हा कृती समितीच्यावतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. हे उपोषण आज ४१ दिवशीही सुरु आहे. या जिल्हा कृती समितीला आ. वैभव पिचड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा कृती समितीच्या स्वाक्षरी नोंदणी वहीवर स्वाक्षरीसह अभिप्राय देत करत त्यांनी संभाव्य संगमनेर जिल्ह्याला जाहिर पाठिंबा दिला.

ते म्हणाले, संगमनेर हे अकोले तालुक्यासह आजूबाजूच्या सर्वच तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी लोकांचे अहमदनगर येथे काही काम असल्यास दोनशे ते अडीशे किलोमीटर अंतर जावे लागते. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेरच जिल्हा करावा, अशी मागणी आ. पिचड यांनी यावेळी केली.

यावेळी संगमनेर जिल्हा कृती समितीचे अमोल खताळ, राजेश चौधरी, शरद नाना थोरात, राजेंद्र देशमुख, अमर कतारी, प्रशांत वामन, लक्ष्मीकांत दसरे, नरेश माळवे, कपिल पवार, शौकत जहागिरदार, शाम कर्पे, रऊफ शेख, पप्पू कानकाटे, मनिष माळवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.