Breaking News

धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज - गिरीश बापट


पुणे, दि. 07, मे - योग्य आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात अर्भकांचा मृत्यू होतो. आर्थिक परिस्थिती नसलेले सर्वसामान्य लोक दवाखान्यात भरण्यास पैसे नसल्यामुळे दवाखान्यात येण्यास घाबरतात. परिणामी गर्भवती स्त्री किंवा नवजात अर्भकाला उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे नवजात अर्भकांचे मृत्यू टाळण्यासाठी समाजातील धनिकांनी समाज हितासाठी पैसे खर्च करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन येरवडा येथील स्व. भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय आणि भवानी पेठेतील चंदुमामा सोनावणे प्रसृतीगृह येथे नवजात अर्भकांसाठी दोन अतिदक्षता विभाग उभारण्यात आले आहेत. या विभागाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात बापट बोलत होते.

बापट म्हणाले, योग्य उपचार न मिळाल्यामुळे वर्षाला सहा हजार बालकांचा मृत्यू होत होता. अलिकडे हे प्रमाण अडीच हजारावर आले आहे. आता मुकुल माधव फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागामुळे सर्वसामान्यांना अगदी अल्पदरात किंवा मोफत उपचार मिळतील. पैशाअभावी कुणाचाही अडवणूक केली जाऊ नये, अशी सूचनाही पालकमंत्री बापट यांनी रुग्णालय प्रशासनाला केली. इथे येणा-या प्रत्येक रुग्णाला चांगली वागणूक मिळेल, रुग्णाची हेळसांड होऊ न देण्याची जबाबदारी डॉक्टर, नर्सेस तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणार्या सर्वांनी घ्यावी.