Breaking News

विखे पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थ्याचा दुबई येथे गौरव.


प्रवरानगर :पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकमधील माजी विद्यार्थी अंबरनाथ येथील श्री केमिकल्स कंपनीचे प्रमुख संपत काळे यांना "ग्राहक सेवा उत्कृष्टता २०१८" या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने दुबई येथे भरविण्यात आलेल्या "१२ व्या आंतरराष्ट्रीय अचिव्हर संमेलनात" नुकतेच गौरविण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा.मनोज परजणे यांनी दिली.

इंडियन अचिव्हर फोरम व युनाइटेड अरब एमिरेट्स मिनिस्टर ऑफ इकॉनॉमी,यांच्या वतीने दुबई येथे भरविण्यात आलेल्या "१२ व्या आंतरराष्ट्रीय अचिव्हर संमेलनात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री सुनील लालबहादूर शास्त्री, संयुक्त अरब अमिरातच्या अर्थ खात्याचे सचिव अब्दुल्ला अल, सुभैल ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष सुहैलमोहम्मदमदाद अल झरुनी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार काळे यांना प्रदान करण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केमिकल उद्योग क्षेत्रात मोठी भरारी काळे यांनी घेतली असून आर्थिक पाठबळ नसतानाही उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात त्यांना यश आले आहे. यापुर्वीही त्यांना इंडियन अचिव्हर अवॉर्ड हा मानाच्या पुरस्कार मिळाला असल्याचे उपप्राचार्य प्रा. नामदेव गरड यांनी सांगितले. प्रवरेत मिळालेल्या मुल्यशिक्षणाचा मला करियर घडविण्यासाठी मोठा फायदा झाला असून मी प्रवरेचा सदैव ऋणी असल्याची प्रतिक्रिया काळे यांनी दिली. त्यांच्या या यशाबद्दल विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले.