Breaking News

शालेय पटावर नोंद नसल्याने विद्यार्थिनी ठरली शाळाबाह्य! शिक्षण विभागाची अक्षम्य दिरंगाई


कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील सवंत्सर येथील भावना रणजित जगताप ही विद्यार्थिनी संजीवनी इंग्लिश मिडियम स्कुलमधून जिल्हा परिषदेच्या लोणारवस्ती, दशरथवाडी शाळेत मागील शैक्षणिक वर्षापासून पाचवीच्या वर्गात बसू लागली. पण सदर शाळेने दाखलाच न दिल्यामुळे आणि तालुका गटशिक्षणअधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे तिची शालेय पटावर नोंदच झाली नाही. त्यामुळे ही मुलगी १२ महिने शाळाबाह्य राहिली. ऐन निकालाच्या दिवशी निकालपत्र न मिळाल्याने या विद्यार्थिनीला अश्रू आवरता आले नाहीत. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानाला शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे मूठमाती देण्यात आली. यामुळे पालकांत प्रचंड संताप पसरला आहे. 

सवंत्सरचे रणजित रामभाऊ जगताप यांची कन्या भावना ही संजीवनी इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिकत असताना जमिनीच्या नापिकीमुळे तिचे शैक्षणिक शुल्क भरणे तिच्या पालकांना शक्य झाले नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी मागील वर्षी तिला या शाळेतून काढून लोणारवस्ती शाळेत मुख्याध्यापकांच्या संमंतीने पाचवीच्या वर्गात बसवले. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शाळेकडून वारंवार दाखला मागणी करुनही तिचा दाखला अद्यापपावेतो देण्यात आलेला नाही. याबाबत पालकांनी संबंधित शाळेकडे पाठपुरावा केला. मात्र शैक्षणिक शुल्क अव्वाच्या सव्वा मागणी करण्यात आली. त्यामुळे वर्षभरात दाखला मिळालाच नाही. याबाबत जगतापांनी ही बाब दि. १५ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी {जा. क्र. कार्या. ४/ खा प्रा शा / १६५/२०१८ दि. ९/ २/ २०१८ } च्या पत्राने संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार तातडीने दाखला देण्याचा आदेश दिला होता. जर शाळा दाखला देणार नसेल तर शाळेची सविस्तर तपासणी करण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले होते. याउलट दाखला देण्याऐवजी सदर संस्थेने जगताप यांना पुढील दहावी इयत्तापर्यंतची वाढीव फी आकारणीची नोटीस पाठविली. आता हे प्रकरण जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कसे हाताळणार आणि भावनाला काय न्याय देते, हे पाहणे ते महत्वाचे झाले आहे.