वाजपेयींच्या काळात दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या नाही : काँग्रेस
शिमोगा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात दलितांवर अत्याचाराच्या व जमावाच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या नसल्याचे मत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिमोगा येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना आझाद म्हणाले, की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा जमावाकडून होणार्या हल्ल्यांच्या घटना घडल्या नाही. दलितांवरील अत्याचाराच्या घटना त्याच्या कार्यकाळात घडल्या नाही. लोक काय शिजवतात हे बघण्यासाठी वाजपेयींचे सरकार लोकांच्या स्वयंपाक घरात डोकावले नाही. जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे कर्नाटकला सध्या युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर अनेक नेते राज्यात सभा घेत आहेत. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी 12 मेला मतदान होणार आहे. तर निकाल 15 मेला घोषित करण्यात येतील.