Breaking News

गुजरातवरून मागविलेल्या ईव्हीएम मशीनवर खा. पटेलांचा आक्षेप

भंडारा : महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने गुजरात राज्याच्या सुरत येथून ईव्हीएम मशिन मागविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली आहे.
 
महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची केवळ एक पोटनिवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. असे असताना या पोट निवडणुकीसाठी सुरत येथून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन पाठविण्यात आल्यामुळे संशयासाठी जागा निर्माण होत आहे. ही पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी यासाठी आणि निवडणुकीविषयी विश्‍वासार्हता निर्माण होण्यासाठी या मशिनची तपासणी होणे गरजेचे आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या मशिन्सची गरज असते त्यापैकी 10 टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन होणे गरजेचे असून या पोटनिवडणुकीत या निर्देशांचे पालन होते का ? असा प्रश्‍न राज्य सभा सदस्य खा. प्रफुल पटेल यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच उन्हाळा खूप तापू लागल्यामुळे प्रचार सभेसाठी वेळ वाढविण्यात यावा आणि रखरखत्या उन्हामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाची वेळसुद्धा वाढविण्यात यावी अशी मागणी खा.पटेल यांनी केली निवडणूक विभागाकडे केली आहे. तर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी करिता निवडणूक निरिक्षक एन.बी.उपाध्याय, शफुल हक व तेजपाल सिंग फुल्का हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. यापैकी निवडणूक निरीक्षक उपाध्याय हे गुजरातहून आले आहेत हे विशेष.