Breaking News

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी समीर अहमद भट ऊर्फ समीर टायगरचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. पुलवामाच्या द्राबगाम परिसरात झालेल्या या चकमकीत एक नागरीक पण मारला गेला असून झालेल्या गोळीबारात दोन सुरक्षा कर्मी देखील जखमी झाले आहेत. परिसरातील एका घरात हे दहशतवादी असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळताच राज्य पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात गराडा घातला. शोध मोहिमेदरम्यान एका घरातून झालेल्या अंदाधूंद गोळीबारात दोन सुरक्षाकर्मी जखमी झाले, असे एका अधिकार्‍याने सांगितले. यात दगडफेक करणार्‍या जमावटोळीचा पाठलाग करताना एक नागरिकही मारला गेला. स्थानिकांनी लष्कराची ही चकमक अपयशी करण्यासाठई दगडफेक केली, असेही तो अधिकारी म्हणाला. एका घरावर केलेल्या अंदाधूंद गोळीबारात पहिला दहशतवादी मारला गेला. त्याचे नाव आकिब मुश्ताक आसून हा पुलवामाच्या राजपोरा परिसराचा रहिवाशी आहे. दुपारी सव्वादोनच्या सुमारास पुलवामा परिसरातल्या अनेक नेते आणि नागरिकांच्या हत्येचा दोषी समीर टायगर मारला गेला. तो एप्रिल 2016 पासून दहशतवादी कारवाईंमध्ये सामिल होता.