Breaking News

विदर्भात उष्णतेची लाट कायम ! उष्णतेचा पारा 46 अंशाच्या वर

नागपूर : विदर्भात येत्या 5 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून पारा 45 अंशाच्या वर जाणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अंगाची लाही लाही करणार्‍या या उन्हापासून बचाव करण्याची गरज आहे. रविवारी विदर्भातील चंद्रपूर शहरात उष्णतेचा पारा 46 अंशाच्या पलीकडे गेला होता. तसेच नागपूर, वर्धा, अकोला या शहरांमध्येही 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे अंग भाजून काढणारे ऊन नागपूरकरांची चांगलीच ’अग्नि’परीक्षा घेत आहे.

विदर्भात सकाळपासूनच प्रखर उन्हाला सुरूवात होते. दुपारी तर घराबाहेर पडणेही अशक्य होते. घराबाहेर पडण्याचा नाईलाज असल्यास दुपट्टा, स्कार्फ, टोपी, रुमाल, गॉगल्स यांचा आधार घेत नागरिक घराबाहेर पडतात. याशिवाय शरिरात पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी लिंबुपाणी, उसाचा रस, लस्सी, ताक यासारख्या शीतपेयांचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. दरम्यान, सध्या विदर्भात उत्तरेकडून उष्णवारे वाहत आहेत. त्यात बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारेही बंद झाले आहे. त्यामुळे कोरड्या उष्णवार्‍यांमुळे विदर्भात तापमान वाढले आहे. संपूर्ण मे महिन्यात कडक उन्हाचा सामना करणार्‍या नागपूरकरांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.