Breaking News

उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा प्रकार देशाच्या छातीत सुरा भोसकणारा

नवी दिल्ली : पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात उमेदवारांच्या छातीवर एससी/एसटी असे लिहिण्यात आले होते, अशा प्रकारे उमेदवारांच्या छातीवर जात लिहित भाजप सरकारने आपल्या जातीयवादी वर्तनाने देशाच्या छातीत सुरा भोसकल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. मध्यप्रदेशमधील युवकांच्या छातीवर एससी व एसटी लिहिल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर राहुल यांनी ट्वीट करून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्यप्रदेशमधील युवकांच्या छातीवर एससी व एसटी लिहून देशाच्या संविधानावरच हल्ला केल्याचाही आरोप त्यांनी केला. मध्य प्रदेशातील पोलीस भरतीत मैदानी चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांचाही समावेश आहे. या उमेदवारांची स्वतंत्र वर्गवारी करणे सोपे व्हावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने उमेदवारांच्या छातीवर एससी/एसटी असे लिहिले. या प्रकारावरून रुग्णालय प्रशासन आणि भाजपा सरकारवर प्रचंड टीका होत आहे.

मध्यप्रदेशमधील युवकांच्या छातीवर जात लिहिल्याच्या घटनेचा निषेध राहुल गांधी यांनी केला. भाजप सरकारच्या जातीयवादी वर्तनाने देशाच्या छातीत सुरा घुपसला आहे. मध्यप्रदेशमधील युवकांच्या छातीवर एससी व एसटी लिहून देशाच्या संविधानावरच हल्ला करण्यात आल्या आहे. हीच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. हीच विचारसरणी दलितांच्या गळ्यात मडके व कंबरेला झाडू बांधायला लावत होती. मंदिरात प्रवेश न देणारेही यांच्याच विचारसरणीचे होते. अशा या विचारसरणीला हरवायचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यप्रदेशमधील धार जिल्हा रुग्णालयात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्यांची जात लिहिल्याचा प्रकार रविवारी समोर आला होता. दरम्यान धारचे पोलीस अधीक्षक बिरेंद्र सिंह यांनी निषेध करत घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.