Breaking News

अंबाजोगाई तालुक्यात 80 लक्ष रुपयांचे खोदकाम

अंबाजोगाई : तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 10 लाख घनमीटरचे जलसंधारणाचे खोदकाम 15 गावांमध्ये झाले. यात श्रमदानातून 80 हजार घनमीटर तर मशीनद्वारे 9 लाख घनमीटर काम करण्यात आले. 15 गावच्या ग्रामस्थांनी चक्क श्रमदानातून 80 लाख रुपयांचे खोदकाम करून पाणीदार गावांसाठी ग्रामस्थांनी केलेली कठोर मेहनत पुढे आली आहे. तर प्रशासनाचे दुर्लक्ष अनेक गावांना भोवले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत निधी न मिळाल्याने अनेक गावच्या कामांना फटका बसला.

अंबाजोगाई तालुक्यात वॉटर कप स्पर्धेस पंधरा गावांनी सहभाग नोंदविला. यात पठाण मांडवा, हातोला, पोखरी, भावठाणा, उजनी, ही गावे अग्रेसर राहिली. तर उर्वरित दहा गावांमध्येही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. पठाण मांडवा येथे 14 हजार घनमीटर खोदकाम श्रमदानातून तर 2 लाख 40 हजार घनमीटर खोदकाम जेसीबी व पोकलेन मशीनच्या माध्यमातून झाले. हातोला येथे श्रमदानातून 14 हजार घनमीटर तर मशीनद्वारे 1 लाख 30 हजार घनमीटर, पोखरी येथे श्रमदानातून 11 हजार घनमीटर तर मशीनद्वारे 1 लाख 20 हजार घनमीटर, भावठाणा येथे श्रमदानातून 10 हजार घनमीटर तर मशीनद्वारे 1 लाख 20 हजार घनमीटर, उजनी येथे श्रमदानातून 4 हजार घनमीटर, तर मशीनद्वारे 1 लाख 20 हजार घनमीटर काम झाले. तसेच ममदापूर (परळी), पूस, भतानवाडी, सोमनवाडी, कोदरी, सनगाव, कुंबेफळ, शेपवाडी, वरवटी, गिरवली बावणे, या गावातही श्रमदान व मशीनरीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली. 15 गावांमध्ये श्रमदानातून 78 हजार घनमीटर तर मशीनद्वारे 10 लाख घनमीटर असे अंदाजे 11 लाख घनमीटरचे काम झाल्याने आगामी काळात कोट्यावधी लिटर पाण्याची बचत या पंधरा गावांमध्ये होणार आहे.

पंधरा गावातील लोकांनी श्रमदानाच्या माध्यमातून 80 हजार घनमीटर खोदकाम केले. एका घनमीटरला शंभर रुपये या प्रमाणे 80 हजार घनमीटरचे 80 लाख रुपये होतात. इतक्या मोठ्या रकमेचे काम ग्रामस्थांनी एकजुटीने करून अंबाजोगाई तालुक्यात मोठा आदर्श प्रस्थापित केला आहे. घाम गाळून गावासाठी घेतलेली मेहनत व ग्रामस्थांची झालेली एकजूट हे खर्‍या अर्थाने या स्पर्धेचे फलित ठरले आहे.

प्रशासनाची अनास्था अनेक गावांना भोवली : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्या गावांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा निधी मशीनच्या इंधनासाठी देण्यात यावा. असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंधरा गावच्या लोकांनी महिनाभरापूर्वीच तहसील कार्यालयाकडे आपले प्रस्ताप दाखल केले. गावांनी केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिका व सर्व बाबींची पूर्तता केली. हा निधी काम चालू आहे. त्या 45 दिवसांच्या कालावधीत घेणे क्रमप्राप्त असते. मात्र प्रशासनाच्या लाल फितीच्या व टोलवाटोलवीच्या कारभारामुळे स्पर्धेचा कालावधी संपला तरीही हा निधी गावांना उपलब्ध झाला नाही. परिणामी अनेक गावांना इंधनाअभावी मशीनीरीजची कामे करता आली नाहीत. याचा मोठा फटका जलसंधारणाच्या कामाला सहन करावा लागला. स्पर्ध संपल्यानंतर दि. 24 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील 12 गावांना इंधनापोटीचे दिड लाखांचे धनादेश देण्यात आले. हीच रक्कम आधी स्पर्धा सुरु असताना मिळाली असती तर आणखी अधिक मशीन कामाला लावता आल्या असत्या अशी प्रतिक्रिया श्रमकर्यांनी व्यक्त केली.