Breaking News

‘अशोक’च्या 65 वर्षाच्या वाटचालीत पाच नवीन ऐतिहासिक विक्रमांची नोंद - राऊत


श्रीरामपूर  - अशोक सहकारी साखर कारखान्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या 2017-18 च्या गळीत हंगामात दि.1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी 6 लाख 46 हजार मे.टन ऊस गळीत करुन 6 लाख 90 हजार साखर पोत्यांच्या निर्मितीसह डिस्टीलरी प्रकल्पाद्वारे 52 लाख लिटर्स अल्कोहोल निर्मिती याशिवाय सहविजनिर्मिती प्रकल्पाद्वारे 5 कोटी 75 लाख युनिटस् वीज निर्मिती करुन 3 कोटी 93 लाख युनिटस् महावितरणला विक्री करुन त्याद्वारे 25 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविले. अशातर्‍हेने कारखान्याच्या 65 वर्षाच्या वाटचालीतील ऊस गळीत, साखर उत्पादन, अल्कोहोल निर्मिती तसेच वीज निर्मिती व महावितरण कंपनीला वीज विक्रीद्वारे उत्पन्नाचे आजवरचे सर्व विक्रम मोडून नवीन ऐतिहासिक पाच विक्रम 177 दिवसांत प्रस्थापित झाल्याची माहिती कारखान्याचे चेरमन सोपानराव राऊत यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना राऊत यांनी सांगितले की, अशोक कारखान्याने यापुर्वी सन 2010-11 च्या गळीत हंगामात 6 लाख 12 हजार 107 मे. टन ऊस गाळप, 6 लाख 87 हजार 130 साखर पोत्यांची निर्मितीचा उच्चांक 241 दिवसांत केला होता. सदरचा उच्चांक मोडून यंदाच्या गळीत हंगामात दि.01 मे 2018 रोजी 177 दिवसांत 6 लाख 46 हजार मे. टन ऊस गाळप व 6 लाख 90 हजार साखर पोत्यांची निर्मिती करुन नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पाद्वारे यापुर्वीचा सन 2007-08 मध्ये 210 दिवसांत 41 लाख लिटर्स अल्कोहोल निर्मितीचा विक्रम मोडला गेला असून यंदाच्या गळीत हंगामात 177 दिवसांत 52 लाख लिटर्स अल्कोहोल निर्मितीच्या नव्या विक्रमाची नोंद झाली.
त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2011 मध्ये कार्यान्वित झालेल्या सहविजनिर्मिती प्रकल्पाद्वारे यापुर्वी सन 2014-15 च्या गळीत हंगामात 5 कोटी 58 लाख 90 हजार युनिटस् वीज निर्मिती आणि 3 कोटी 88 लाख युनिटस्ची महावितरण कंपनीला विक्री करुन 24 कोटी 37 लाख रुपयाचे उत्पन्नाचा उच्चांक होता. वीज निर्मितीचा उच्चांकही यंदाच्या गळीत हंगामात 5 कोटी 75 लाख युनिटस्ची वीज निर्मिती व 3 कोटी 93 लाख युनिटस्ची महावितरण कंपनीला विक्रीद्वारे 25 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. अशोक साखर कारखान्याच्या 65 वर्षाच्या वाटचालीत सन 2017-18 च्या हंगामात ऊस गाळप, साखर उत्पादन, अल्कोहोल उत्पादन तसेच वीज निर्मिती व महावितरण कंपनीला केलेल्या वीज विक्रीद्वारे मिळालेले उत्पन्न असे पाच ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित झाले असून गळीत हंगाम अद्यापही प्रगतीपथावर आहे. या ऐतिहासिक विक्रमाबद्दल कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, ऊस तोडणी मजूर, ऊस तोडणी यंत्राचे चालक, मालक, ऊस वाहतुकदार, ऊस वाहतुक करणार्‍या ट्रक, ट्रॅक्टरचे मालक व चालक, व्यापारी, तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे कारखान्याचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे, चेरमन सोपानराव राऊत, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, कार्यकारी संचालक लक्ष्मण गाढे, तसेच संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.