Breaking News

महाराष्ट्रदिनी त्रिमूर्ती संकुलातील परेड संचलन ठरले सर्वांचे आकर्षण


नेवासाफाटा - महाराष्ट्र दिनी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील बालसैनिकांनी सादर केलेले पथसंचलन सर्वांचे आकर्षण ठरले. अनेकांनी दिलेल्या बलिदानातून महाराष्ट्र उभा राहिला आहे, महाराष्ट्राची भूमी ही महान देशभक्तांसह राष्ट्रपुरुषांची व संतांची भूमी आहे या महाराष्ट्रभूमीचे सौंदर्य वाढविणे व तिचे जतन व जपवणूक करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा अँड. सुमतीताई घाडगे यांनी महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.

यावेळी त्रिमूर्तीच्या भव्य मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व मार्गदर्शक मेजर साहेबराव घाडगे ,कर्नल कृपाल सिंग, जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा अँड. सुमतीताई घाडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन तर कर्नल कृपाल सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्रिमूर्तीच्या बाल सैनिकांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. त्यानंतर महाराष्ट्रगीत सादर करण्यात आले. इयत्ता नववीतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी कर्नल कृपाल सिंग, सुधीर चव्हाण यांची भाषणे झाली .महाराष्ट्राबद्दल गौरवोदगारयुक्त भाषणे यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली.यावेळी बोलताना मेजर साहेबराव घाडगे पाटील म्हणाले की महाराष्ट्राची शान वाढविण्यासाठी माझ्या बालसैनिकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाच्या व गुणवत्तेच्या माध्यमातून काम करावे, मेहनत घ्यावी व देशात महाराष्ट्राचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा.


यावेळी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनिष घाडगे, दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डीले, गोरक्षनाथ वराळे, समन्वयक दत्तात्रय वांढेकर, प्राचार्य आशिष भारती, डॉ.अनुराधा गोरे, प्राचार्या भारती वहाडणे, संभाजी निकाळजे, संजयसिह चौव्हान, शरदराव चनघटे, संगीत विशारद इरफान चाऊस यांच्यासह पालक, शिक्षकवृंद, बाल सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा.अशोक गाडे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.