Breaking News

एमपीएससी विद्यार्थ्यांचे 19 ते 24 मे दरम्यान पोलखोल हल्लाबोल’

पुणे : राज्यातील सरकारी कार्यालयामध्ये 1 लाख 77 हजार रिक्त जागा तसेच 50 हजार पोलीस भरती तत्काळ भरण्यात याव्यात, तसेच परीक्षेत होणारे गैरप्रकार बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, खासगी कंपनीला नोकर भरतीचे कंत्राट देऊ नये या व अशा अनेक मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे ते आझाद मैदान दरम्यान हा मोर्चा 19 ते 24 मे दरम्यान काढण्यात येणार आहे. राज्यात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या प्रमाणात आहे तर त्या तुलनेत सरकारी नोकर भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळेच रिक्त जागा असतानाही शासनाकडून होत नसलेल्या नोकरभरतीबाबत सरकारविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या सरकार नोकर भरती भ्रष्टाचारविरोधी संघर्ष समिती’तर्फे पुण्याच्या नदीपात्रातून ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुण्यातून निघणार असून तळेगाव दाभाडे, कर्जत, कल्याण, ठाणेमार्गे आझाद मैदानात जाणार आहे.
एमपीएससी डमी रॅकेट प्रकरण, नांदेड येथील पोलीस भरती घोटाळा, परिवहन निरिक्षक भरती घोटाळा, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, मागील सात वर्षांत खोटी प्रमाणपत्रे मिळवून जागा अडवून बसलेले अधिकारी आदींची चौकशी व्हावी; तर शिक्षक व प्राध्यापक भरती आयोगामार्फत व्हावी, सरकारी व निमसरकारी भरती आयोगामर्फत व्हावी, राज्य पातळीवरील परीक्षा महामंडळे बरखास्त करावी, ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन घेण्यात यावी, उत्तरपत्रिकेसाठी बारकोड वापरण्यात यावा, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात याव्यात, भगतसिंग रोजगार हमी कायदा महाराष्ट्राने लागू करावा, एमपीएससीची स्वतंत्र इमारत व राज्यभरात 4 प्रादेशिक कार्यालयांसाठी अधिकारी व कर्मचारी भरती करावी अशीही मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे.