Breaking News

डीएसके विरोधात 36 हजार पानांचे आरोपपत्र दाखल 2043 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डी. एस. कुलकर्णींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केले आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात हे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. डीएसकेंविरोधात तब्बल 36 हजार 875 पानांचे भले मोठे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चक्क चार गाड्या भरून हे आरोपपत्राचे दस्त न्यायालयात आणले आणि न्यायपीठासमोर दाखल केले. डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी या दोघांविरोधातील हे आरोपपत्र असून या मध्ये 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे आरोप पत्रात नमूद करण्यात आले आहे. डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना 17 फेब्रुवारीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. अटकेनंतर 90 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आज डीएसके दाम्पत्याच्या अटकेला तीन महिने पूर्ण होत असताना आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत आर्थिक व्यवहार विभागाचा प्रमुख विनयकुमार बदगंडी यालाही आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात डीएसके कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक आणि डी. एस. कुलकर्णी यांच्या भावाचा जावई केदार वांजपे आणि त्याची बायको सई वांजपे तसेच डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यालाही बुधवारी पोलिसांनी अटक केली होती.