Breaking News

सलग 12 व्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली : सलग 12 व्या दिवशीदेखील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण वाढताना दिसत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या किमतीत 32 पैशांची तर डिझेलच्या किमतीत 18 पैशांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसीएल) सुधारित दराप्रमाणे पेट्रोलच्या किमती दिल्लीमध्ये 77.83 रुपये, मुंबईमध्ये 85.65 रुपये, कोलकात्यामध्ये 80.47 आणि चेन्नईमध्ये 80.80 रुपये प्रतिलिटर असेल. तर डिझेलच्या किमती दिल्लीत 68.75 रुपये, मुंबईत 73.2 रुपये, कोलकाता 71.30 रुपये प्रतिलिटर असेल. हे सर्व दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, त्याप्रमाणे देशांतर्गत इंधनाच्या दरातदेखील वाढ होताना दिसत आहे. सोबतच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्यदेखील घसरत असल्याने इंधन दरावर त्याचाही परिणाम होत आहे.
विरोधी पक्षांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर सातत्याने वाढत असलेल्या इंधन दराबाबत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्वीकारल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यावर चिमटा काढला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आकाशात उडणार्‍या रॉकेटप्रमाणे वाढणार्‍या इंधनाच्या किमती कमी करून दाखवा, असे आव्हान दिले आहे.