Breaking News

कर्नाटकात 10 हजार बोगस मतदानकार्ड जप्त भाजपाच्या अडचणीत वाढ

बंगळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात बंगळुरू येथील एका घरांतून तब्बल 10 हजार बोगस मतदान कार्ड जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. इतके मोठे बोगस मतदान कार्ड तयार करून कर्नाटक विधानसभा निवडणूकीत बोगस मतदान करण्याचा डाव होता का? बोगस मतदानपत्र काही वितरीत झाले आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. बोगस मतदान पत्र सापडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

बंगळूरूतील राज राजेश्‍वरी नगरमधील जलाहल्ली भागात बुधवारी सकाळी ज्या फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली, तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसे विका मंजुला अंजामरी यांचा असल्याचे समोर आल्यामुळे भाजपाच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. याप्रकरणी काँग्रेसने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राजेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात 4 लाख 35 हजार 439 मतदार आहेत. संबंधित ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यात जवळपास 9746 मतदान ओळखपत्रे आढळून आले आहेत. ही ओळखपत्रे खरी असल्याचे संजीव कुमार म्हणाले. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी 5 लॅपटॉप, 1 प्रिंटर जप्त करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर आरोप करत काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ज्या घरात हे बोगस ओळखपत्र सापडले. त्या घर मालकीणीचा भाजपशी संबंध असून, संपूर्ण प्रकारात भाजपच्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.