काटेवाडी दुहेरी हत्याकांडातील 10 आरोपिंना जन्मठेप
जामखेड : तालुक्यातील काटेवाडी येथे 2014 मध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पितापुत्रांच्या दुहेरी खुन खटल्यातील 10 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, तर उर्वरीत 17 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील 5 आरोपी फरार आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी या प्रकरणात बाजू मांडली. महादेव गहिनीनाथ बहिर, सुखदेव रघुनाथ बहिर, शहाजी रघुनाथ बहिर, मल्हारी कैलास बहिर, दादा किसन बहिर, राजेंद्र महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहिर, कैलास तात्याबा बहिर, सोमनाथ उध्दव बहिर, संदिप गणपत बहिर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दहा आरोपींची नावे आहेत.
जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील मयत आसाराम बहिर यांचे त्यांच्याच भावकीतील महादेव बहिर यांच्याशी जमिनीवरून वाद सुरु होते. वादाबाबत दोघांनी एकमेकांविरोधात तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. तसेच जामखेड येथील न्यायालयामध्ये खटला हा महादेव बहिर व इतरांनी आसाराम बहिर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. न्यायालयाने तो दावा मंजूर करुन महादेव बहिर व इतरांनी त्यांच्या ताब्यात हरकत घेवून अडथळा करु नये असा आदेश 13 मे 2013 रोजी दिला. त्यामुळे रागावलेल्या आसाराम बहिर यास धमक्या देणे, मारहाण करणे, शेतात येण्यास प्रतिबंध करणे अशा प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर आसाराम यांनी जामखेड पोलिस निरीक्षक, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे आरोपींनी न्यायालयाचा अवमान करुन मारहाण करीत असल्याबाबत तक्रार अर्ज दिले होते.
12 मे 2014 रोजी आरोपी महादेव बहिर व इतर 32 साथीदार हे आसाराम यांच्या घराजवळ आले. त्यांच्या हातात गज काठ्या व लाकडी दांडगे असे हत्यारे होते. त्यातील काही आरोपींनी घरात घुसून झोपेत असलेल्या आसारामला उठवून घराच्या बाहेर ओढत आणून मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी नितीनलाही बेदम मारहाण केली. मारहाण चालू असताना नितीनच्या बचावासाठी आलेल्या आई गयाबाई यांनाही आरोपींनी मारहाण केली, त्यात त्या जबर जखमी झाल्या. घटनेत जबर जखमी झालेल्या आसाराम व नितीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.