Breaking News

‘त्या’ एटीएम केंद्रांची चौकशी होणार

नवी दिल्ली । वृत्तसंस्था - देशाच्या काही भागांत जाणवत असलेली रोकड टंचाई आणि त्यावरून होणार्‍या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी पावले उचलतानाच कोणत्या एटीएम केंद्रातून, कोणी आणि किती रोकड काढली आणि त्यामागचे कारण काय याची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यावरून केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेवर टीकेची झोड उठली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणी खुलासा केल्यानंतरही टीकेचा भडिमार सुरूच आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. एटीएम केंद्रांवर पुरेशी रोकड पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. शिवाय, भविष्यात अशी अडचण निर्माण होऊ नये म्हणूनही उपाय केले जात आहेत. आरबीआयच्या सर्व प्रांतीय कार्यालयांनी रोख रकमेची मागणी व पुरवठ्याचा अंदाज घेऊन दर महिन्याला अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. देशातील 2,166 एटीएम केंद्रांतून अचानक मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढली गेल्याचे निदर्शनास आले आहे.