Breaking News

बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला

नगर । प्रतिनिधी - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नेवासा फाटा येथील महिलेचा मृतदेह औरंगाबादच्या वाळुज औद्योगिक वसाहतीत आढळला. संगीता विलास शिंदे (वय 40, रा. समतानगर, नेवासा फाटा) असे मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालयात परिचारिकेचे काम करणार्‍या संगीता या आपल्या दोन मुलांबरोबर समतानगर येथे राहत होत्या. दि. 17 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता हॉस्पिटलमधून बेपत्ता झाल्याची नोंद त्यांचा मुलगा सागर याने पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान दि. 19 एप्रिल रोजी वाळुज (जि. औरंगाबाद) येथील एमआयडीसीच्या जोगेश्वरी भागात एक्सटेंड कंपनीच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत वाळुज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद नोंदविली होती. नेवासा पोलिस ठाण्याच्या माध्यमातून हा मृतदेह संगीता शिंदे यांचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर दि. 20 रोजी दुपारी नेवासा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता शिंदे यांचा खून कोणी व कशासाठी केला असावा, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.