Breaking News

कुळधरण ग्रामपंचायतीत 14 वित्त आयोग निधीतील पाईपलाईन कामात अफरातफर ?

कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामपंचायतीच्या 2016-17 या कालावधीत 14 व्या वित्त आयोग निधीतून झालेल्या कामात अफरातफर झाल्याची तक्रार कुळधरण येथील बंडू गंगाधर सुपेकर यांनी केली होती. आपले सरकार पोर्टलवर केलेल्या तक्रारीचे कोणत्याही प्रकारे निवारण न करता अहमदनगरचे सीईओ यांनी परस्पर तक्रार टोक्लोस केली. याबाबत सुपेकर यांनी पुन्हा शासनाकडे दाद मागितली. त्यावर त्यांना लेखी पत्र आले असल्याचे सुपेकर यांनी स्पष्ट केले.

तक्रार टोक्लोज केल्याने सुपेकर यांनी शासनाकडे पुन्हा पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तक्रारीतील कोणत्याही मुद्याचे निवारण न करता सीईओ यांनी लेखी निवारण पत्र न देता, चुकीचा व धादांत खोटा मजकूर कसलीही चौकशी न करता उत्तरादाखल टाकून दिशाभूल केली त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती. महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी मदन सोंडे यांनी पत्र दिले असुन त्यात आवश्यक कारवाईसाठी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असल्याचे म्हटले आहे.
कुळधरण येथे झालेले बारव खोलीकरण व पाईपलाईन काम इस्टिमेटप्रमाणे करण्यात आले नाही. पंचायत समितीतील अभियंता, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने गैरव्यवहार व लाखो रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. इस्टिमेटप्रमाणे काम न करता पाइपलाईनचे पाईप जागोजागी 1 फुट खोलही पाईप गाडण्यात आले नाहीत व बिल मात्र सर्व काढण्यात आलेले आहे. या तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण कक्ष अहमदनगर यांचेमार्फत प्रत्यक्ष तक्रारदारासमोर पाईपलाईन खोदुन त्याची पाहणी करावी व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुपेकर यांनी केली होती. ज्या अभियंत्याच्या सहीने बिल काढले त्यांस तक्रार निवारण कामी घेवून हा गैरव्यवहार दडपण्यात येत आहे. चुकीची माहिती कळवुन शासनाच्या निधीत अपहार केला आहे. शासन चोराच्या हाती चौकशीचे काम देवुन पाईपलाईन कामात झालेल्या गैरव्यवहारावर पांघरून घालत आहे.त्याची तक्रारदारासमोर पाहणी करुन तक्रारदार म्हणेल त्याठिकाणी पाइपलाईनची खोदाई करुन कारवाई करावी. चौकशी अहवाल सीईओ यांनी स्वतःच्या सहीनिशी तक्रारदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करुन द्यावा. मजकुर टाइपमध्ये माहिती देवुन सीईओ अप्रत्यक्षपणे हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुपेकर यांनी केली होती. नुकतेच लेखी पत्र मिळाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत न्याय देतील अशी अपेक्षा बंडू सुपेकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.

दै. लोकमंथनचा पाठपुरावा सुरुच 
पाईपलाईन कामाच्या तक्रारीवर सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करुन दै. लोकमंथनने याबाबतचा पाठपुरावा सुरुच ठेवला आहे. 19 नोव्हेंबरला प्रथम वृत्त प्रसिध्द करुन तक्रारदाराला न्याय देण्याची भूमिका प्रसारमाध्यम म्हणून लोकमंथनने पार पाडली. सुपेकर यांना महाराष्ट्र शासनाचे पत्र प्राप्त होताच लोकमंथनकडे सुपूर्द करण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नावर वेळोवेळी आवाज उठविला जात असल्याने दै. लोकमंथनचा अनेकांनी धसका घेतला आहे.