हार्वेस्टरद्वारे गहू मळणी कामांना वेग
कर्जत तालुक्यातील खेड, शिंपोरा, औटेवाडी, गणेशवाडी, भांबोरा, कुळधरण, बारडगाव, जलालपूर या परिसरात गव्हाचे पिक घेण्यात आले आहे. गहू काढणीसाठी जवळपास सर्वच शेतकरी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहेत. सध्या मजूरांचे दर खूप वाढलेले आहेत. यामध्ये एक एकर गहू मजुरांद्वारे काढण्यासाठी दोन हजार रुपये कापायला तर परत मळणीला दिड ते दोन हजार असे एकूण तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये जवळपास पाच-सहा दिवस जात आहेत. हाच एक एकर गहू हार्वेस्टर मशीनद्वारे काढल्याने साधारण एक ते दीड हजार रुपये खर्च येतो व अवघ्या अर्ध्या तासात गहू काढून पोत्यात भरला जातो. मशीनने गहू काढायला वेळ व पैसा दोन्हीही वाचत आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी गहू काढणीसाठी हार्वेस्टरला प्रथम पसंती देत आहेत.